Hemant Dhome : आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून…पुण्यातील आंदोलनावर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया
Hemant Dhome Post : पुण्यात एमपीएससी परीक्षेसंदर्भात आंदोलन सुरू आहे. यावर राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावर आता अभिनेता हेमंत ढोमेनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

पुण्यात एमपीएससीच्या परीक्षापद्धतीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत आपलं मत व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेते किरण मानेही त्या आंदोलनात सहभागी झालेले. अशातच आता मराठी अभिनेता हेमंत ढोमेनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत ढोमे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि सामाजिक तसेच राजकीय विषयांवर त्याचं मत मांडतो.
हेमंत ढोमेची पोस्ट
पुण्यातील आंदोलनाबद्दल हेमंत ढोमे म्हणाला की, ‘पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे…आणि दुर्दैवाने आता त्या विद्यार्थ्यांवरच टीका सुरू झाली आहे. काही लोक जाणीवपूर्वक या मुलांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण एक साधा प्रश्न आहे…ज्या विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा दिली, त्यांच्या परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले, तर त्यांनी आवाज उठवायचा नाही का?’
‘पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकारांचा फटका या मुलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या भविष्यातील संधींना बसतो. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावरच टीका करणं योग्य आहे का? आणि मुळात या पोरांनी काय मागितलंय? न्याय, पारदर्शकता आणि त्यांच्या भवितव्याबद्दल स्पष्टता! त्यांच्या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि एक गोष्ट सरकार आणि प्रशासनाने नक्की कृपया लक्षात घ्यावी…शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागेल, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस उत्तरं दिली पाहिजेत.’
‘कारण हा फक्त काही तरूणांचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांचा आवाज ऐका. समजून घ्या. त्यांच्याशी बोला. आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या. हा तिढा सोडवा!’ असं हेमंतनं शेवटी म्हटलं आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ‘पुणे बंद करणार’ असं वक्तव्य केल्यानंतर ‘पुणेकरांचा बाणा वेगळा आहे. तेही रस्त्यावर उतरतील. पुणेकर काय आहेत, हे त्यांना कळेल’ असं महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या.
