टायगर श्रॉफ प्रकरणी मोठी अपडेट समोर, गोळीबार करण्यापूर्वी देण्यात आली होती इतकी रक्कम
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट. राजस्थानच्या कोटामधून तीन आरोपींना अटक. गोळीबार करण्यापूर्वी देण्यात आली होती मोठी रक्कम.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील कथित गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थान पोलिसांच्या एजीटीएफ पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. तिन्ही आरोपी रेल्वे कॉलनी परिसरात लपून बसले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना आरोपींचे शेवटचे लोकेशन अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात मिळाले होते. त्यानंतर आरोपी रेल्वेने मुंबईबाहेर पळून गेल्याचे तपासात समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि शेजारील राज्यांतील पोलिसांना माहिती दिली. या समन्वयामुळे कोटा येथे आरोपींना पकडण्यात मदत झाल्याचे वृत्त आहे.
गोळीबारासाठी 50 हजार रुपये आगाऊ दिल्याचा दावा
पोलिसांच्या तपासानुसार, टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यासाठी आरोपींना 50 हजार रुपये आगाऊ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे आणि आरोपींना कोणी काम दिले, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असून तो हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. रेहान नावाचा दुसरा आरोपीही सोनीपतचा असल्याचे सांगितले जाते तर ऋतिक कुमार ऊर्फ रोशन हा बिहारमधील बेगुसराय येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
या प्रकरणात मुंबई पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते. हल्ल्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या साथीदारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. आरोपी महाराष्ट्राबाहेरून, कदाचित परदेशातून, कारवाया करत असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.
18 ऑक्टोबरला जुहू परिसरात गोळीबार
मिळालेल्या वृत्तानुसार, 18 ऑक्टोबर रोजी रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्कजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या घटनेत अभिनेता बचावल्याचे सांगण्यात आले, तर त्याचा कारचालक आणि जवळील एका ऑटोरिक्षाचा चालक जखमी झाल्याचे वृत्त आहे.