Salman Khan: जीव वाचवायचा असेल तर सलमानने मंदिरात येऊन..; बिश्नोई समाजाची ती अट कायम

सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वादाचा संबंध 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जातो. बिश्नोई समाजात काळवीटाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या प्रकरणावरून अनेक वर्षांपासून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Salman Khan: जीव वाचवायचा असेल तर सलमानने मंदिरात येऊन..; बिश्नोई समाजाची ती अट कायम
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2026 | 11:06 AM

Salman Khan : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर बिश्नोई समाजाशी संबंधित देवेंद्र बुढिया यांनी सलमान खानला समाजाची माफी मागण्याचं आवाहन केलं आहे. सलमानने पुढाकार घेऊन हा वाद संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर सलमान माफी मागेपर्यंत आपण प्रयत्न करत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

‘सलमानने माफी मागावी, तरच वाद संपेल’

देवेंद्र बुढिया यांनी एएनआयशी संवाद साधताना सलमान खानला माफी मागण्याचं आवाहन केलं. त्यांच्या मते, एखाद्या समाजाची माफी मागितल्याने व्यक्तीचं मोठेपण कमी होत नाही. उलट, अशा कृतीमुळे वाद मिटवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सलमानने पुढाकार घेतल्यास अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर शांततापूर्ण तोडगा निघू शकतो, असं त्यांनी सांगितलं. बुढिया यांनी दावा केला की, सुमारे दीड वर्षांपूर्वीही त्यांनी सलमान खानशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी सलमानला या प्रकरणाचं गांभीर्य समजावून सांगितलं होतं. सलमानने सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र त्यानंतर भेट होऊ शकली नाही, असं बुढिया यांनी म्हटलं. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, यासाठी आपण प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

लॉरेन्स बिश्नोईशीही चर्चा केल्याचा दावा

देवेंद्र बुढिया यांनी लॉरेन्स बिश्नोईशीही संवाद साधल्याचा दावा केला आहे. लॉरेन्सच्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी हा वाद आणखी वाढवू नये आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी केली होती. सलमान खान वर्षभराच्या आत माफी मागण्यासाठी पुढे येऊ शकतो, असं आपण लॉरेन्सला सांगितलं होतं, असा दावाही बुढिया यांनी केला. त्यानंतर लॉरेन्सने 12 महिन्यांचा अवधी देण्याबाबत सहमती दर्शवली होती, असं त्यांनी सांगितलं. मात्र, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. एखाद्याला इजा करून नेमकं काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित करत बुढिया यांनी संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर दिला.

‘मंदिरात येऊन माफी मागावी’

देवेंद्र बुढिया यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाच्या मंदिरात येऊन माफी मागण्याचं आवाहन केलं आहे. बिश्नोई समाज दयाळू आणि उदार असल्याचं सांगत, चर्चेच्या माध्यमातून हा वाद संपवता येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, सलमान खानने अद्याप या आवाहनाला काय प्रतिसाद दिला आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. फुटबॉल खेळून परतताना ही घटना घडली. टायगर या हल्ल्यात सुरक्षित राहिला, मात्र त्याच्या चालकाला दुखापत झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us