Jahnavi Killekar : माझा मेंदू बंद पडला, मला वाटलं आता मी मरणार…पदरात दीड महिन्याचा लेक अन् ओढावलं संकट, जान्हवी किल्लेकरनं सांगितला प्रसंग
Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

जान्हवी किल्लेकर सध्या अनेक सिनेमांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री बिग बॉसमध्येही झळकलेली. जान्हवी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स देते. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. जान्हवीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे. जान्हवीच्या मेंदूत छोटीशी गाठ आलेली, त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.
जान्हवी किल्लेकरनं सांगितला प्रसंग
आयुष्यातील कठीण प्रसंग सांगताना जान्हवी किल्लेकर म्हणाली की, ‘आजही मी जी काही बिनधास्त फिरतेय, ते माझ्या घरच्यांमुळेच आहे. माझ्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आलेला. मी दोन दिवस आयसीयुमध्ये होते. त्यावेळी, ईशानला घरातल्यांनी सांभाळलं. तेव्हा तो खूपच लहान होता आणि त्याला सोडून राहणं खूपच कठीण होतं. त्यावेळी मला वाटलेलं की, मी आता मरणार आहे. माझा मेंदूच बंद पडलेला. आधी थोडा त्रास व्हायचा, पण नंतर समजलं की, मेंदूत छोटा क्लॉट आहे. मेंदूचा रक्तस्त्राव बंद झालेला. पण, मी वाचले.’ ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री बोलत होती.
यापूर्वीही जान्हवीनं एका मुलाखतीदरम्यान यादरम्यानचा प्रसंग सांगितलेला. अभिनेत्री म्हणालेली की, ‘ईशानच्या जन्मानंतर तो दीड महिन्याचा असताना हे झालं. मी किचनमध्ये असताना माझं शरीर अचानक उडायला लागलं. उजव्या बाजूचं शरीर अचानक उडायला लागल्याचं मला जाणवू लागलं. म्हणजे मला कळतच नव्हतं की, माझ्याबरोबर हे काय होत आहे. मी माझा पाय पकडला, पण शरीर उडतच होतं. मला वाचवा… म्हणून ओरडत होते. मला मरायचं नाही, असं म्हणत होते आणि मी पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर मला सहा दिवसांनी शुद्ध आली.’
दरम्यान, जान्हवी किल्लेकरच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेत्री आदिनाथ कोठारेसोबत ‘मिरांडा वॉर्निंग‘ या सिनेमात झळकणार आहे.
