भाऊजी-मेहुणीच्या नोकझोकीवर आधारित 48 वर्षांपूर्वीचं गाजलेलं गाणं, मेहुणीच्या 7 अटी अन् भाऊजींनी दिलेले भन्नाट उत्तर

मेहुणी आणि भाऊजी यांच्यामधील मजेदार अटींवर आधारित 48 वर्षे जुन गाणं. ज्यामध्ये मेहुणीने होणाऱ्या भाऊजीसमोर ठेवलेल्या भन्नाट अटी, भाऊजीने देखील दिलं होतं खास उत्तर. आजही ते गाणं प्रचंड हिट.

भाऊजी-मेहुणीच्या नोकझोकीवर आधारित 48 वर्षांपूर्वीचं गाजलेलं गाणं, मेहुणीच्या 7 अटी अन् भाऊजींनी दिलेले भन्नाट उत्तर
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 29, 2026 | 2:32 PM

भाऊजी आणि मेहुणीचं नातं म्हटलं की त्यात प्रेम, मस्करी, नोकझोक आणि एकमेकांची मजा घेणं आलंच. बॉलिवूडमध्येही या गोड नात्यावर अनेक मजेदार गाणी तयार झाली आहेत. यापैकीच एक गाणं तब्बल 48 वर्षांनंतरही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून ऐकायला मिळतं. या गाण्यात होणारी मेहुणी आपल्या होणाऱ्या भाऊजीसमोर एकामागून एक भन्नाट अटी ठेवते आणि होणारा नवरा त्यावर तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तरं देतो.

हे गाणं आहे 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन बिन सुहागन’ या चित्रपटातील ‘जीजाजी जीजाजी होने वाले जीजाजी’. सावन कुमार टाक यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात नूतन, राजेंद्र कुमार, विनोद मेहरा आणि पद्मिनी कोल्हापूरे यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

Loading...

सात फेरे आणि सात मजेदार अटी

या गाण्याची खासियत म्हणजे लग्नातील सात फेऱ्यांना मेहुणीच्या सात अटींशी जोडण्यात आलं आहे. मेहुणी आपल्या होणाऱ्या भाऊजींना सांगते की, या अटी मान्य केल्या तरच बहिणीचा हात त्यांच्या हातात दिला जाईल.

गाण्यातील अटीही भन्नाट आहेत. दीदी स्वयंपाक करणार नाही, ती दुसऱ्या कुणाशी नजरा भिडवणार नाही, तसेच लग्नानंतरच्या आयुष्याशी संबंधित अनेक गंमतीदार अटी मेहुणी भाऊजींसमोर ठेवते. त्यावर भाऊजी देखील हार न मानता आपल्या मजेशीर उत्तरांनी मेहुणीचीच फिरकी घेतात.

उदाहरणार्थ, दीदी स्वयंपाक करणार नाही, अशी अट ऐकल्यावर भाऊजी हॉटेलमधून जेवण मागवण्याचं सांगतात. तर नजरा कुणाशी भिडवायच्या नाहीत, या अटीवर ते थेट त्या डोळ्यांवरच आपलं प्रेम असल्याचं मजेशीरपणे सांगतात. त्यामुळे गाण्यातील संवाद ऐकताना लग्नाचं वातावरण आणखी रंगतदार होतं.

पत्नीला संपूर्ण कमाई देण्यापासून अनेक अटी

या गाण्यात मेहुणीकडून होणाऱ्या भाऊजींसमोर अशा अनेक अटी मांडल्या जातात, ज्यामध्ये पत्नीला आपली संपूर्ण कमाई देण्यापासून ते माहेरून तिला लवकर परत न बोलावण्यापर्यंतच्या गंमतीदार गोष्टींचा समावेश आहे. शेवटी होणारा नवरा ‘आधी लग्न होऊ द्या, तुम्ही जे म्हणाल ते मान्य करेन’, अशा अंदाजात उत्तर देतो.

यामुळे हे गाणं केवळ गाणं न राहता भाऊजी-मेहुणीमधील मजेशीर संवाद बनतं. आजही लग्नसमारंभांमध्ये भाऊजी-मेहुणी एकमेकांना हे गाणं समर्पित करताना दिसतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us