लग्न न करताच या अभिनेत्रीला व्हायचंय आई, म्हणाली स्वत:बाळाला जन्म देऊन मातृत्वाचा अनुभव घ्यायचाय
विना लग्न करता या भोजपुरी अभिनेत्रीला व्हायचंय आई. म्हणाली स्वतः बाळाला जन्म देण्याचा आणि मातृत्वाचा अनुभव घेण्याची तिची इच्छा आहे.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल राघवानी सध्या ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमधील वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 35 व्या वर्षी काजलने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. तिला लग्न करण्याची इच्छा नसली तरी स्वतःच्या बाळाला जन्म देऊन मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे असे तिने स्पष्ट केले. यासोबतच तिने जुन्या नात्यात सहन कराव्या लागलेल्या कथित शारीरिक हिंसाचाराबद्दलही धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘राइज अँड फॉल 2’मध्ये सहस्पर्धक सोनम मलिक हिच्याशी संवाद साधताना काजलने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या इच्छेबद्दल सांगितले. तिने म्हटले की, तिला लग्न करण्यात रस नाही; मात्र स्वतःचे बाळ हवे आहे. स्वतः बाळाला जन्म देण्याचा आणि मातृत्वाचा अनुभव घेण्याची तिची इच्छा आहे. ही तिची वैयक्तिक निवड असून आई होण्यासाठी लग्न करणे आवश्यक आहे असे तिला वाटत नसल्याचे तिच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
जुन्या नात्यात शारीरिक हिंसाचाराचा आरोप
काजलने आपल्या जुन्या नात्याबद्दल बोलताना तीव्र शारीरिक हिंसाचाराला सामोरे जावे लागल्याचा दावा केला. ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केले, त्याने आपल्याला मारहाण केल्याचे तिने सांगितले. तिला जमिनीवर आपटणे, लाथ मारणे आणि केस ओढणे अशा घटना घडल्याचेही तिने कथन केले.
या अनुभवांबद्दल बोलताना काजलने संबंधित व्यक्तीचे नाव घेण्यास नकार दिला. त्या व्यक्तीबद्दल लोकांनी आधीच मत बनवले असल्याने आपल्याला त्याचे नाव सांगण्याची गरज वाटत नसल्याचे तिने स्पष्ट केले.
केस हातात आले अन् अभिनेत्री भावूक झाली
जुन्या घटनेची आठवण सांगताना काजल भावूक झाली. मारहाण थांबल्यानंतर केसांना हात लावला असता, हातात केसांचे तुटलेले पुंजके आल्याचे तिने सांगितले. शारीरिक जखमांपेक्षा केस तुटल्यामुळे आपल्याला अधिक मानसिक त्रास झाल्याचेही तिने नमूद केले.
या अनुभवांमुळे आता कोणावरही सहज विश्वास ठेवता येत नसल्याची भावना तिने व्यक्त केली. जुन्या नात्यातील अनुभवांचा तिच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे तिच्या वक्तव्यांतून दिसून आले. मात्र, तिने संबंधित व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही.
भोजपुरी चित्रपटसृष्टीत काजलची वेगळी ओळख
काजल राघवानी ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनेता खेसारी लाल यादव याच्यासोबतची तिची जोडीही विशेष गाजली आहे.