घर मोडणाऱ्यांना डोक्यावर उचलून घेणं..; गोविंदा-कोमलच्या व्हिडीओनंतर कश्मीरा शाहची पोस्ट, म्हणाली ‘अत्यंत घृणास्पद’

Govinda: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांनी लालबागचा राजाचं एकत्र दर्शन घेतल्यानंतर आता कश्मीरा शाहची पोस्ट चर्चेत आली आहे. तिने ही पोस्ट गोविंदाला उद्देशूनच लिहिली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

घर मोडणाऱ्यांना डोक्यावर उचलून घेणं..; गोविंदा-कोमलच्या व्हिडीओनंतर कश्मीरा शाहची पोस्ट, म्हणाली अत्यंत घृणास्पद
कश्मीरा शाह, गोविंदा-कोमल राणी स्वर्णकार
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 4:21 PM

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या चर्चित भेटीनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. गणेशोत्सवादरम्यान गोविंदा आणि कोमल राणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र पोहोचले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू झाली. आता अभिनेत्री आणि कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिच्या एका क्रिप्टिक पोस्टने या चर्चेत आणखी भर पडली आहे. कश्मीरा शाहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘घर मोडणाऱ्यांचं उदात्तीकरण करणं थांबवा’ अशा आशयाचं भाष्य केलं. तिने अशा पुरुषांनाही लक्ष्य केलं, जे आपल्या पत्नीला सोडून कथितरित्या तरुण आणि महत्त्वाकांक्षी महिलांकडे वळतात. कश्मीरा शाहने पोस्टमध्ये कोणाचंही थेट नाव घेतलेलं नाही. मात्र, तिची पोस्ट गोविंदा आणि कोमल राणी यांच्या ताज्या व्हायरल व्हिडीओनंतर समोर आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

गोविंदा-कोमल राणी एकत्र दिसल्यानंतर चर्चा

गणेशोत्सवादरम्यान गोविंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कोमल राणी स्वर्णकारसोबत पोहोचला. दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. गोविंदाने यावेळी बाप्पाची आरती केली आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषही केला. विशेष म्हणजे त्याच दिवशी गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीसुद्धा स्वतंत्रपणे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं.

कश्मीरा शाहची पोस्ट

‘लोक एका ‘मिस्ट्री महिले’ला इतकं ग्लॅमराइज करून तिच्याबद्दल पोस्ट करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. घरं उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तींचं उदात्तीकरण करणं थांबवा आणि आपल्या निष्ठावान पत्नीला सोडून तरुण, महत्त्वाकांक्षी मुलींच्या मागे जाणाऱ्या पुरुषांना आदर्श मानणंही थांबवा. हे अत्यंत घृणास्पद आहे. आपल्या समाजाकडून अधिक समजूतदारपणा आणि नैतिकतेची अपेक्षा आहे. कृपया हा सगळा वेडेपणा थांबवा,’ अशी पोस्ट कश्मीराने लिहिली आहे. यासोबतच तिने ‘चिटिंग’ (फसवणूक), ‘मॅरेज’, ‘वाइफ’ (लग्न, पत्नी), फॅमिली असे हॅशटॅगसुद्धा जोडले आहेत.

गोविंदा आणि कोमल राणी यांच्यातील नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. कोमल राणी ही गोविंदाच्या आगामी ‘रुपा’ या चित्रपटातील सहकलाकार आहे. गोविंदाने यापूर्वी तिला त्याच्या आगामी चित्रपटाची सहकलाकार म्हणून माध्यमांसमोर आणलं होतं. गोविंदा आणि कोमल राणीच्या भेटीनंतर सुनीता अहुजा यांची प्रतिक्रियाही चर्चेत आली. ‘माणसं धोकेबाज असतात’ अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध गोविंदाच्या ताज्या व्हिडीओशी जोडला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us