KBC 18: अमरावतीमधील चहावाल्याची मुलगी KBC 18मध्ये, 12 लाख रुपयांच्या या प्रश्नाचे दिले चुकीचे उत्तर
KBC 18: अमरावतीमधील चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या बापाची लेक प्रगती दिनेश कल्पेकर ही केबीसीमध्ये पोहोचली आहे. ती बुद्धीमत्तेच्या जोरावर 12 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. पण या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे तिला 5 लाख रुपये घेऊन घरी परतावे लागले.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय क्वीज शो म्हणून कौन बनेगा करोडपती पाहिला जातो. या शोचा 18वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकून घरी जातात. नुकताच या शोमध्ये अमरावतीमधील एका चहावाल्याची मुलगी सहभागी झाली. तिने हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला. पण 12 लाख रुपयांसाठी ‘कोमागाता मारू’ या जहाजाशी संबंधीत विचारलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे 5 लाख रुपये घेऊन घरी यावे लागले आहे.
वडिलांची चहाची टपरी
अमरावतीची प्रगती दिनेश कल्पेकरने पटापट उत्तर देत हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला. त्यानंतर तिने तिच्या संघर्शाची कथा सांगितली. डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंगल्याची खंत आणि आयएफएस (IFS) अधिकारी बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा तिने सांगितली. रस्त्या रुंदीकरणाच्या काळात प्रगतीच्या वडिलांची चहाची टपरी हटवण्यात आली. त्यानंतर कुटुंबावर कठीण काळ आला होता. तेवढ्यात प्रगतीला नोकरी लागली. प्रगती सध्या अमरावती येथील सरकारी विभागीय माहिती कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करते.
प्रगती कुटुंबाच्या सर्व आर्थिक अडचणींचा सामना करते. ती सध्या संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळत आहे. ती घराचे भाडे भरणे, कुटुंबियांसाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे, त्यांना आनंदात ठेवण्यासाठी ती प्रयत्न करत असते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रगती केबीसीमध्ये आली होती. पण एका चुकीच्या उत्तराने तिची रक्कम अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाली. तिला केवळ 5 लाख रुपये घरी घेऊन जावे लागले. प्रगतीला विचारलेल्या 12 लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल का?
काय विचारला होता प्रश्न?
प्रगतीला 12 लाख रुपयांसाठी, कॅनडाच्या स्थलांतरविषयक नियमांना आव्हान देण्यासाठी 1914 मध्ये ‘कोमागाता मारू’ हे जहाज कोणी भाड्यानं घेतलं होतं? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी,
A. सोहन सिंह भकना
B. लाला हर दयाल
C. बाबा गुरदित सिंह
D. करतार सिंह सराभा
हे पर्याय देण्यात आले होते. प्रगतीकडे 50:50 ही लाइफलाइन शिल्लक होती, पण तिने ती न वापरता पर्याय ‘डी’ (D), म्हणजेच करतार सिंह सराभा, हा पर्याय निवडला होता. मात्र, याचे योग्य उत्तर ‘बाबा गुरदित सिंह’ हे होते. 12 लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे ती केवळ 5 लाख रुपये घेऊन घरी परतली.