किशोर कुमार घरात का आणून ठेवायचे कवट्या आणि हाडं? मुलाने सांगितलं कारण, ऐकून…
किशोर कुमार यांनी त्यांच्या घरात जमा करून ठेवल्या आहेत कवट्या आणि हाडे. नेमकं कशासाठी घरात आणायचे हाडे? मुलानेच केला मोठा खुलासा.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आनंद, प्रेम, विरह अशा विविध भावना त्यांच्या गाण्यांमधून अनुभवायला मिळतात. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. मात्र, आपल्या गाण्यांइतकाच किशोर कुमार यांचा हटके स्वभाव आणि त्यांच्या आयुष्यातील भन्नाट किस्सेही चर्चेत राहिले आहेत.
किशोर कुमार यांच्याबाबतचा असाच एक रंजक किस्सा म्हणजे शूटिंगदरम्यान ते अचानक गाडी घेऊन निघून गेले होते. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी दिग्दर्शकांनी त्यांना गाडी चालवून काही अंतरापर्यंत जाऊन परत येण्यास सांगितलं होतं. मात्र, किशोरदा गाडी घेऊन गेले ते परत आलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर समजलं की, ते शूटिंग सोडून थेट खंडाळ्याच्या दिशेने निघून गेले होते.
कवट्या आणि हाडं घेऊन यायचे घरी
किशोर कुमार यांना वेगवेगळ्या आणि विचित्र वाटणाऱ्या वस्तू गोळा करण्याचाही छंद होता. त्यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील आठवण सांगितली होती. विकी लालवानी यांच्याशी झालेल्या संवादात अमित कुमार यांनी सांगितलं की, किशोर कुमार नैरोबी येथे कार्यक्रमासाठी गेले असताना तिथून कवट्या आणि हाडं घेऊन आले होते. या वस्तू आजही ट्रस्टमध्ये जतन करून ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा अनोखा पैलूही अनेकांना आश्चर्यचकित करतो.
चार वेळा केलं लग्न
किशोर कुमार यांचं वैयक्तिक आयुष्यदेखील कायम चर्चेचा विषय ठरलं. त्यांनी आयुष्यात चार विवाह केले होते. 1950 मध्ये त्यांनी बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिलं लग्न केलं. या दाम्पत्याला अमित कुमार हा मुलगा झाला. मात्र, 1958 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1960 मध्ये किशोर कुमार यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्याशी दुसरं लग्न केलं. मधुबाला यांच्या आजारपणामुळे आणि 1969 मध्ये झालेल्या त्यांच्या निधनामुळे या नात्याचा अंत झाला.
13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोर कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांना काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्षं झाली असली तरी त्यांच्या आवाजाची जादू अजूनही कायम आहे. आपल्या अजरामर गाण्यांसोबतच हटके स्वभावामुळे आणि आयुष्यातील अनोख्या किस्स्यांमुळे किशोरदा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.