109 वर्षांपूर्वीचा चित्रपट, पाहण्यासाठी थिएटरबाहेर दिवसभर व्हायची गर्दी, चित्रपटाने 32 हजारांची केलेली कमाई

109 वर्षांपूर्वीच रुपेरी पडद्यावर अवतरली होती रामायणाची कथा. ‘लंका दहन’ चित्रपटाने रचला होता इतिहास. पाहण्यासाठी थिएटरबाहेर दिवसभर असायची गर्दी. 32 हजार रुपयांची केलेली कमाई.

109 वर्षांपूर्वीचा चित्रपट, पाहण्यासाठी थिएटरबाहेर दिवसभर व्हायची गर्दी, चित्रपटाने 32 हजारांची केलेली कमाई
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 20, 2026 | 6:14 PM

दसऱ्याच्या निमित्ताने रावणदहन आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण केली जाते. याच रामायणातील कथेला आजपासून तब्बल 109 वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावर साकारण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्या काळात चित्रपट मूकपट असायचे. कलाकारांचे संवाद ऐकू येत नव्हते तरीही एका पौराणिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. या ऐतिहासिक चित्रपटाचे नाव होते ‘लंका दहन’. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये आवाज आणि संवाद नसत. कलाकारांच्या अभिनयातून, चेहऱ्यावरील हावभावांतून आणि पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या सीनमधून प्रेक्षकांना कथा समजत असे. अशा काळात 1917 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लंका दहन’ या मूकपटाने पौराणिक कथेला प्रभावीपणे पडद्यावर आणले.

Loading...

रामायणावर आधारित या चित्रपटात रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेणे, भगवान रामांनी सीतेला परत आणण्यासाठी युद्धाची तयारी करणे तसेच हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेणे आणि लंकेचे दहन करणे असे महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले होते. संवाद नसतानाही कथानक आणि सीनच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत रामायण पोहोचवण्यात या चित्रपटाला यश मिळाले.

एका अभिनेत्याने साकारल्या राम आणि सीतेच्या भूमिका

‘लंका दहन’ चित्रपटातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यातील कलाकारांची निवड. या चित्रपटात अण्णा साळुंके यांनी भगवान राम आणि माता सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. त्या काळात महिलांनी चित्रपटांत अभिनय करणे सामाजिकदृष्ट्या सहज स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे स्त्री पात्रांच्या भूमिकाही अनेकदा पुरुष कलाकार साकारत असत.

अण्णा साळुंके यांनी एकाच चित्रपटात स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे त्यांच्या कामाची विशेष नोंद घेतली जाते. चित्रपटात गणपत जी शिंदे यांनी हनुमानाची, तर डी. डी. दाबके यांनी रावणाची भूमिका साकारली होती.

चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी

‘लंका दहन’ हा चित्रपट केवळ आपल्या कथेमुळेच नाही तर त्याच्या लोकप्रियतेमुळेही लक्षात राहिला. उपलब्ध वृत्तांनुसार, मुंबईतील वेस्ट एंड सिनेमा चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असे. चित्रपटाचे शो सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचेही सांगितले जाते.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे 32 हजार रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. त्या काळातील परिस्थिती लक्षात घेता ही मोठी रक्कम मानली जात होती. आवाज, संवाद आणि आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही केवळ कथानक, अभिनय आणि सीनच्या बळावर चित्रपटाने मिळवलेले यश उल्लेखनीय होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us