Madhuri Dixit: पैठणीत माधुरी दीक्षितचा मराठमोळा अंदाज, ‘कोण होणार करोडपती’मधल्या लूकची एकच चर्चा

Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती' या शोचं सूत्रसंचालन करणार असून यामध्ये तिचा मराठमोळा लूकही पहायला मिळणार आहे. पैठणी साडीतील माधुरीचा हा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Madhuri Dixit: पैठणीत माधुरी दीक्षितचा मराठमोळा अंदाज, ‘कोण होणार करोडपती’मधल्या लूकची एकच चर्चा
माधुरी दीक्षित
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 27, 2026 | 10:11 AM

माधुरी दीक्षित म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा मोहक अभिनय, नृत्याची अदाकारी आणि दिलखेचक अंदाज. आता हीच लोकप्रिय अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय गेम शोच्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार आहे. या कार्यक्रमाचा प्रीमियर 12 ऑक्टोबर 2026 पासून सोनी मराठी आणि ‘सोनी लिव्ह’वर होणार आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या पहिल्या लूकमध्ये माधुरीचा खास पैठणी साडीतील मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालक म्हणून माधुरीचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे. सुंदर पैठणी साडी, पारंपरिक दागिने आणि माधुरीचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व यामुळे हा लूक लक्षवेधी ठरत आहे. तिच्या या लूकमध्ये पारंपरिक वैभव आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

माधुरीसाठी हा लूक केवळ फॅशनचा भाग नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी असलेलं त्यांचं नातं व्यक्त करणारा आहे. पैठणीबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, ही केवळ एक सुंदर साडी नसून तिच्यामध्ये महाराष्ट्राचा शतकानुशतकांचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिकवारसा विणलेला आहे. माधुरीने पैठणीच्या वैशिष्ट्यांविषयीही आपलं मत व्यक्त केलं. प्रत्येक पैठणीची स्वतःची एक वेगळी ओळख असते आणि तिच्या विणकामातील सौंदर्य आपल्याला विशेष आवडतं, असं त्यांनी सांगितलं. आपल्या संस्कृतीशी जोडलेलं राहून तिचा आधुनिक पद्धतीने उत्सव साजरा करणं हीदेखील एक सुंदर अनुभूती असल्याचं माधुरी म्हणाली.

त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या निमित्ताने माधुरीचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनात ‘कोण होणार करोडपती’चा आगामी सिझन केवळ प्रश्न आणि उत्तरांपुरता मर्यादित राहणार नाही. ज्ञान, स्वप्नं आणि प्रेरणादायी प्रवासाच्या कहाण्या या पर्वाचा महत्त्वाचा भाग असणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये माधुरीच्या नव्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. स्पर्धकांना आव्हानात्मक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून, त्यांच्या मोठ्या स्वप्नांबरोबरच आयुष्यातील संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवासही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

माधुरी दीक्षितला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्याचा हा अनुभव तिच्या चाहत्यांसाठीही वेगळा असणार आहे. अभिनेत्री म्हणून अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता त्या गेम शोच्या माध्यमातून ज्ञान, मनोरंजन आणि प्रेरणेचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’चा प्रीमियर 12 ऑक्टोबर 2026 पासून सोनी मराठीवर होणार असून, सोनी लिव्हवरही हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us