16 व्या वर्षी मंदाकिनीने केलेला ब्रेस्ट फीडिंगचा सीन; इतक्या वर्षांनंतर सांगितला शूटिंगचा खरा किस्सा
राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अभिनेत्री मंदाकिनी 16 वर्षांची होती. त्या चित्रपटात स्तनपानाचं दृश्य कसं चित्रित केलं गेलं, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

Mandakini: बॉलिवूडच्या इतिहासातील काही चित्रपट आणि त्यातील प्रसंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ हा असाच एक चित्रपट. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अभिनेत्री मंदाकिनीला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. मात्र चित्रपटातील धबधब्याचा सीन आणि ब्रेस्ट फीडिंगसारखा भासणारा प्रसंग यामुळे त्यावेळी मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. आता अनेक वर्षांनंतर मंदाकिनीने या सीनमागचं सत्य सांगितलं आहे. मंदाकिनीने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘राम तेरी गंगा मैली’च्या शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा ती केवळ 16 वर्षांची होती. राज कपूर यांचा हा शेवटचा दिग्दर्शकीय चित्रपट होता. या चित्रपटातील गंगा ही भूमिका मंदाकिनीने साकारली होती.
चित्रपटातील धबधब्याच्या सीनबद्दल बोलताना मंदाकिनीने सांगितलं की राज कपूर यांनी हा प्रसंग तिला समजावून सांगितला होता. त्यांच्या पद्धतीने शूटिंग करताना तिला अश्लील किंवा अस्वस्थ वाटलं नाही, असं अभिनेत्रीने म्हटलं. एका प्रसंगात साडीबाबत तिला थोडं अस्वस्थ वाटल्यावर तिने ती पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सीन शूट करण्यात आला. ‘राम तेरी गंगा मैली’मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रसंगाबाबत मंदाकिनीने महत्त्वाचा खुलासा केला. चित्रपटात प्रत्यक्षात ब्रेस्ट फीडिंग झालं नव्हतं, असं तिने स्पष्ट केलं. हा प्रसंग कॅमेरा अँगल आणि फ्रेमिंगच्या मदतीने अशा पद्धतीने चित्रित करण्यात आला होता की, प्रेक्षकांना आई आपल्या बाळाला दूध पाजत असल्याचा भास व्हावा.
ब्रेस्ट फिडिंगच्या शूटिंगदरम्यान मंदाकिनीजवळ एक बाळ होतं आणि तिने त्याला तिच्या शरीराच्या अगदी जवळ धरलं होतं. कॅमेऱ्याच्या विशिष्ट अँगलमुळे तो प्रसंग वेगळ्या पद्धतीने दिसत होता. त्यामुळे वर्षानुवर्षे या सीनबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत राहिल्या. चित्रपटाच्या यशानंतर अनेक निर्मात्यांना मंदाकिनीकडून पुन्हा अशाच प्रकारचे धबधब्याचे सीन करून घ्यायचे होते. मात्र, तिने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. तिच्या मते एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी केवळ एखादा बोल्ड किंवा चर्चेत राहणारा सीन पुरेसा नसतो. कथा, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, सादरीकरण आणि चित्रपटाचा संदेश या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात, असं तिने सांगितलं.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती, गोविंदा यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, गंगा ही व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील काही प्रसंग आजही तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चिलेले क्षण मानले जातात.