Prapti Redkar : त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं…मराठी अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग
Prapti Redkar : मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरनं तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. एका मुलानं प्राप्तीची छेड काढण्याचा प्रयत्न केलेला.

मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली‘ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. अशातच आता नवरात्रीच्या निमित्तानं स्व–संरक्षणाचं महत्व सांगितलं आहे. प्राप्ती म्हणाली की, ‘मला या नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येक महिला आणि मुलीला एवढाच संदेश द्यायचा आहे की, स्वतःची काळजी घ्या आणि काहीही झालं तरी खचून जाऊ नका. स्वतःसोबत काही चुकीचं घडत असेल, तर त्याचा विरोध करा आणि स्वतःसाठी हिंमतीनं लढा. तुम्हाला हवं तसं जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण, असं जगा की तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या मुख्य भूमिकेत आहात.’
‘तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या आयुष्याची नायिका बनावं आणि खंबीरपणे जगावं. सध्याचा काळ असा आहे की कधी काय घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्तानं स्त्रीशक्तीविषयी बोलताना मला असं वाटतं की, प्रत्येक स्त्रीला संकटाच्या वेळी स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे.’ असंही प्राप्तीनं सांगितलं.
प्राप्ती रेडकरनं सांगितला प्रसंग
प्राप्ती 2022 पासून मार्शल आर्ट्स शिकली असून, त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचंही अभिनेत्रीनं सांगितलं आहे. अभिनेत्रीनं मालाड स्टेशनवर एका मुलाला चांगलीच अद्दल घडवलेली. तो प्रसंग सांगताना प्राप्ती म्हणाली की, ‘एकदा मालाड स्टेशनवर एका मुलानं मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला. त्या वेळी तो कोण होता, हे माझ्या लक्षात आलं नाही. पण, नंतर तो पुन्हा त्याच हेतूनं माझ्या दिशेने येताना दिसला. तेव्हा मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर तो माफी मागू लागला आणि तिथून पळून गेला. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण तेव्हा मला माझ्यातली स्त्रीशक्ती जाणवली. म्हणूनच मी नेहमी सांगते की, प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला निदान स्वतःचं संरक्षण करण्याइतकी तरी माहिती असायला हवी.’
