वर्षा उसगांवकर यांच्या व्हिडीओवरून वाद; अखेर मागावी लागली कोळी समुदायाची माफी

या व्हिडीओविरोधात मच्छिमार असोसिएशनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता वर्षा यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत मासेविक्रेत्यांची माफी मागितली आहे.

वर्षा उसगांवकर यांच्या व्हिडीओवरून वाद; अखेर मागावी लागली कोळी समुदायाची माफी
वर्षा उसगांवकर यांच्या व्हिडीओवरून वाद
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 1:01 PM

ऑनलाइन ॲपवर मासे (Fish) विकणाऱ्या कंपनीच्या व्हिडीओविरोधात देशभरातील मच्छिमारांच्या असोसिएशनने आक्षेप नोंदविला. या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या कोळी मासेविक्रेत्यांविरोधात (Koli Fisherwomen) बोलताना दिसत आहेत. “मला अनेकदा शिळे आणि वास येणारे मासे दिले गेले”, असं त्या म्हणतायात. हे म्हणत असतानाच त्या लोकांना ॲपवरून ताजे मासे विकत घेण्याचं आवाहन करत आहेत. या व्हिडीओविरोधात मच्छिमार असोसिएशनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता वर्षा यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत मासेविक्रेत्यांची माफी मागितली आहे.

“कोळी समूहाच्या भावना मी अनवधानाने दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे”, असं त्या म्हणतायत. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल आणि वरळी मच्छिमार असोसिएशनचे विजय वरळीवर यांनी वर्षा उसगांवकर यांच्या व्हिडीओविरोधात आक्षेप घेतला होता.

“वर्षाताईंनी माफी मागितल्याने आम्ही कायदेशीर नोटीस बजावणार नाही आहोत. मात्र कोळींच्या भावना दुखावल्याप्रकरणी आम्ही त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत”, असं तांडेल म्हणाले.

ऑनलाइन ॲपवरून मासे विकणाऱ्या कंपनीचे सीईओ मकरंद बांदेकर या वादावर म्हणाले, “उसगांवकर यांच्याकडून जो फीडबॅक मिळाला, त्याचा व्हिडीओ आम्ही पोस्ट केला. त्या आमच्या ग्राहक आहेत. मात्र वादानंतर आम्ही तो व्हिडीओ डिलिट केला आहे.”