‘जग बदल घालूनी घाव…’ हे लोकप्रिय गाणं अण्णा भाऊ साठेंना कुठे सूचलं?; हृदयनाथ सिन्नरकरांनी सांगितलेला किस्सा वाचा!

| Updated on: Aug 23, 2021 | 7:50 AM

जुन्या काळातील अनेक गायक, गीतकार, शाहिरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळून पाहण्याचा, भेटण्याचा योग आला. कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर हे त्यापैकी एक. (Hridaynath Sinnarkar)

जग बदल घालूनी घाव... हे लोकप्रिय गाणं अण्णा भाऊ साठेंना कुठे सूचलं?; हृदयनाथ सिन्नरकरांनी सांगितलेला किस्सा वाचा!
annabhau sathe
Follow us on

मुंबई: जुन्या काळातील अनेक गायक, गीतकार, शाहिरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळून पाहण्याचा, भेटण्याचा योग आला. कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर हे त्यापैकी एक. त्यांनाही बाबासाहेबांना जवळून पाहण्याचा योग आला. एकदा नव्हे तर दोनदा ते बाबासाहेबांना भेटले. बाबासाहेबांना सिन्नरकर नेमके कुठे भेटले?, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी बाबासाहेबांवरील प्रसिद्ध गीत कुठं लिहिलं? यावर टाकलेला हा प्रकाश. (know when annabhau sathe wrote song on dr.ambedkar)

अन् बाबासाहेबांचं दर्शन झालं

1943मध्ये हृदयनाथ सिन्नरकर मुंबईत आले. त्यांच्या लहानपणीच त्यांची आई वारली. आई वारली तेव्हा ते सात वर्षाचे होते. त्यांचे वडील पायाने अधू होते. त्यांच्या मेव्हण्याने दादांना मुंबईत आणले होते. ते सुरुवातीला माझगावला बोगद्याच्या चाळीत राहायचे. नंतर शिवडीच्या लेबर कॅम्पात राहायला आले. याच लेबर कॅम्पात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहता आले. त्यावेळी शिवडी लेबर कॅम्पात दलितांचा 90 टक्के भरणा होता. त्यावेळी एन. वाय. लोखंडे हे लेबर कॅम्पातील मोठे नेते होते. बौद्ध समाजातील पहिले महापौर पी. टी. बोराळे, त्यांचे सचिव हरिदास बाळाजी खरात आणि लोखंडे यांनी त्यावेळी बाबासाहेबांना 15 हजार रुपयांची थैली देणगी म्हणून देण्याचा बेत आखला. वर्गणीही जमा करण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1954 रोजी आम्ही दहा बारा कार्यकर्ते सिद्धार्थ महाविद्यालयात गेलो आणि बाबासाहेबांना 15 हजाराची थैली दिली. त्यावेळी पहिल्यांदाच बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचा योग आला, असं ते सांगायचे.

बाबासाहेबांचा वेगळाच आवेश

त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा बाबासाहेबांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. निमित्त होतं 1952ची पहिली सार्वत्रिक निवडणूक. त्यावेळी दादा समता सैनिक दलात होते. साथी अशोक मेहता आणि बाबासाहेबांची पहिली जंगी सभा शिवाजी पार्क मैदानावर पार पडली. ही सभा ऐकण्यासाठी दादा शिवाजी पार्कात गेले होते. त्यावेळी त्यांना सभेतील बाबासाहेबांचा एकूणच अविष्कार वेगळा वाटला. बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं त्यापेक्षा अगदीच न्यारा. बाबासाहेबांच्या भाषणाचा संपूर्ण जोर काँग्रेसविरोधात असायचा. काँग्रेसच्या बेगडी देशप्रेमाचा आणि सामाजिक पुळक्याचा दाखला देता देता बाबासाहेब जनतेचं मार्मिक प्रबोधन करायचे. त्यावेळी लोक बाबासाहेबांच्या भेटीसाठी आतूर असायचे. बाबासाहेब दिसले की त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. रडायचे. तेव्हा बाबासाहेबांचे डोळेही भरून जायचे, असं सिन्नरकर दादा सांगायचे. तेव्हा त्यांचेही डोळे पाणावून जायचे.

‘जग बदल घालून घाव’चा किस्सा

बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी गायनाचे कार्यक्रम होत. त्याकाळी प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकरांचा असाच एक कार्यक्रम सुरू होता. गोविंददादा बाबासाहेबांना गाण्यातून अभिवादन करत होते. या कार्यक्रमाला लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेही उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात अण्णा भाऊंनी ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव…’ हे गाणं लिहिलं. या गाण्याचा मी स्वत: साक्षीदार आहे, असं सिन्नरकरदादा सांगायचे. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (know when annabhau sathe wrote song on dr.ambedkar)

संबंधित बातम्या:

‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा

किरण सोनावणे : गाणं आणि धर्मकारणाचा पूल सांधणारा गायक!

कॅसेटमध्येच नव्हे तर मोर्चा, आंदोलनातही गाणी म्हटली जाऊ लागली; किरण सोनावणेंचे हे पैलू वाचाच!

(know when annabhau sathe wrote song on dr.ambedkar)