बॉयफ्रेंड बनव, पण त्याच्याशी लग्न गरजेचं नाही.. मौसमी चॅटर्जी यांचा मुलीला सल्ला; म्हणाल्या ‘गीतेत लिहिलंय की..’
इतरांना काहीतरी सिद्ध करण्यासाठी काहीही करू नका. तुम्हाला जे आवडतं, ते करा. पण त्याचा अतिरेक करू नका. मीसुद्धा आयुष्यात चुका केल्या आहेत. पण जेव्हा ती चूक लक्षात आली, तेव्हा मी ते पुन्हा कधीच केलं नाही, असं त्या म्हणाल्या.

Moushumi Chatterjee: ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. आता त्यांनी मुलगी मेघा मुखर्जीला दिलेल्या एका खास सल्ल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतःचं लग्न कमी वयात झालेल्या मौसमी यांनी आजच्या मुलींनी लग्नाचा निर्णय घाईघाईने घेऊ नये, असा संदेश दिला आहे. ‘बॉयफ्रेंड असू शकतो, पण त्याच व्यक्तीशी लग्न केलंच पाहिजे असं नाही,’ असं त्या म्हणाल्या. नयनदीप रक्षित यांच्याशी संवाद साधताना मौसमी यांनी त्यांच्या विचारांवर मोकळेपणाने भाष्य केलं. मुलींनी स्वतःच्या आयुष्याचा आणि आनंदाचा विचार करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘थोडं स्वार्थी आणि स्वतःचा विचार करणारे व्हा, कारण काळ बदलला आहे,’ असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.
मौसमी यांचा तरुणांना सल्ला
पूर्वी मुलींना लग्नानंतर सासरची जबाबदारी सांभाळण्याची शिकवण दिली जायची. मात्र, घरातील जबाबदाऱ्या केवळ महिलांनीच पार पाडाव्यात आणि पुरुषांनी त्यापासून दूर राहावं, हा विचार बदलण्याची गरज आहे. आजची तरुण पिढी मोठ्या तणावातून जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. स्वतःसाठी वेळ काढणं आणि आयुष्याचा आनंद घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या. मौसमी यांनी तरुणांना आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला. इतरांना काहीतरी सिद्ध करण्यासाठी कोणताही निर्णय घेऊ नका, असं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, आयुष्यात चुका होऊ शकतात; मात्र एखादी गोष्ट चुकीची असल्याचं लक्षात आल्यानंतर ती पुन्हा करू नये. ‘तुम्हाला जे आवडतं ते करा, मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका,’ असा त्यांचा संदेश होता.
“स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत व्हा..”
‘जागरण फिल्म फेस्टिव्हल 2026’मध्ये त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलीला सांगते की, तुझा बॉयफ्रेंड असू शकतो, पण त्याच व्यक्तीशी तू लग्न करावं हे गरजेचं नाही. आज तुम्ही मुलींनी सावध राहायला हवं. थोडं स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत व्हा, कारण काळ बदलला आहे. गीतेतही हेच लिहिलं आहे की, बदल हाच जगाचा नियम आहे. आपण आपल्या मुलींना सासरच्या मंडळींची काळजी घ्यायला शिकवतो, पण मुलांना नाही. आपला असा समज आहे की घरकाम फक्त स्त्रियांसाठी आहे, ते पुरुषांसाठी नाही. यामुळे आजची पिढी खूप तणावाखाली आहे. ते आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नाही.”
मौसमी चटर्जी यांचा विवाह अगदी कमी वयात झाला होता. ‘बालिका वधू’ या 1967च्या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्यांचं लग्न प्रसिद्ध गायक-संगीतकार हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी यांच्याशी झालं. मौसमी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी वेदना म्हणजे त्यांची मोठी मुलगी पायल हिचं 2019 मध्ये झालेलं निधन. पायल दीर्घकाळ मधुमेहाचा सामना करत होती.