‘मुन्नाभाई MBBS’मधील अभिनेता 10 वर्षांपासून गायब, रात्री काय घडलं? आजही गूढ कायम
बॉलिवूडमधील अतिशय हिट सिनेमाच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘मुन्नाभाई MBBS.’ या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे घर केले आहे. आता या चित्रपटातील एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांचा ‘मुन्नाभाई MBBS’ हा हिंदी सिनेमातील अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटातील तो तरुण आठवतो का, ज्याचं एका मुलीने मन मोडलं होतं आणि त्यानंतर त्याने टोकाचे प्रयत्न केले होते? चित्रपटातील ही छोटीशी पण प्रभावी भूमिका अभिनेता विशाल ठक्करने साकारली होती. या छोट्या भूमिकेतूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण हा अभिनेता आजही गायब आहे. तो कुठे गेला? कसा गेला? असा प्रश्न अनेकांना आजही पडली आहे.
२००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर विशाल ठक्करच्या कारकिर्दीला वेग आला. त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. ‘हँगो चार्ली’सारख्या चित्रपटांत तो दिसला. तसेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘थपकी प्यार की’, ‘आहट’ आणि ‘किस देश में है मेरा दिल’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या. मात्र जानेवारी २०१६ मध्ये विशाल अचानक बेपत्ता झाला. त्याला बेपत्ता होऊन आता १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजपर्यंत त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा थांगपत्ता लागलेला नाही. २०२६ मध्ये विशालचं वय अंदाजे ४० वर्षे झाले असते.
बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?
३१ डिसेंबर २०१५ रोजी विशाल मुलुंड येथील आपल्या घरी कुटुंबासोबत होता. २०१९ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विशालने त्याची आई दुर्गा यांना सोबत थिएटरमध्ये येऊन ‘स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स’ हा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. मात्र आई त्याच्यासोबत गेली नाही. नंतर त्यांना या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला, कारण मुलाला पाहण्याची ती शेवटची वेळ ठरली.
रात्री साडे-दहा वाजण्याच्या सुमारास विशालने आईकडून ५०० रुपये उधार घेतले आणि घराबाहेर पडला. त्यानंतर काही तासांनी, रात्री सुमारे १ वाजता त्याने वडील महेंद्र यांना मेसेज केला. त्याने लिहिले होते, “मी पार्टीला जात आहे. उद्या भेटू.” कुटुंबीयांसाठी तो त्याचा शेवटचा मेसेज ठरला.
गर्लफ्रेंडने विशालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला
पोलिसांच्या माहितीनुसार, नववर्षाची रात्र विशालने आपल्या गर्लफ्रेंडसोबत अहमदाबाद महामार्गाजवळील एका रिसॉर्टमध्ये घालवली होती. परतताना दोघे घोडबंदर रोडवरील फाउंटेन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले. यावेळी विशालने गर्लफ्रेंडला सांगितले की, त्याला अंधेरीमध्ये एका मित्राला भेटायचे आहे. त्यानंतर तो तिथून निघून गेला. २०१६ मध्ये पोलिस अधिकारी जयवंत पडवी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विशाल गेल्यानंतर गर्लफ्रेंडने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याचा फोनही बंद होता. पोलिसांच्या मते, १ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता विशाल अंधेरीला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा घेताना दिसला होता. त्याला तिथे एका शूटसाठी जायचे होते. त्याच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डवरूनही त्याची घोडबंदर रोडच्या आसपास उपस्थिती असल्याचे समोर आली.
अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही
दुपारी सुमारे १२.१० वाजता विशालने फेसबुकवर नववर्षाच्या शुभेच्छांची पोस्ट केली. ही त्याची शेवटची सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी ठरली. त्यानंतर काही वेळातच त्याचा फोन बंद झाला आणि तो पुन्हा कधीच सुरू झाला नाही. तपास अधिकारी एन. ए. कुलकर्णी यांनी त्यावेळी सांगितले होते की, अपहरण आहे की विशाल स्वतःहून कुठेतरी निघून गेला आहे, याचा तपास पोलिसांना करता येत नव्हता. पोलिसांच्या अहवालात विशाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये भांडण झाल्याचाही उल्लेख होता. त्यानंतर गर्लफ्रेंड पोलिसांना घेऊन त्याच्या घरी पोहोचली होती.
असेही सांगितले जात होते की, आपल्या कुटुंबाची झालेली अपमानास्पद वागणूक विशालला सहन झाली नव्हती. त्याच काळात त्याला काम मिळणेही कमी झाले होते. मात्र विशाल ठक्करसोबत पुढे नेमकं काय घडलं, याचं गूढ आजही कायम आहे. १० वर्षांहून अधिक काळ उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.