Neena Gupta: मसाबाला तिच्या वडिलांबद्दल सत्य सांगितलं, पण..; नीना गुप्ता यांनी मागितली लेकीची माफी, म्हणाल्या “माझीच चूक..”

Neena Gupta: अभिनेत्री नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं जगजाहीर होतं. या दोघांनी लग्न केलं नाही, पण विवियन यांच्यापासून नीना यांना मसाबा ही मुलगी आहे. मुलीची अनेकदा माफी मागितल्याचा खुलासा नीना यांनी एका मुलाखतीत केला आहे.

Neena Gupta: मसाबाला तिच्या वडिलांबद्दल सत्य सांगितलं, पण..; नीना गुप्ता यांनी मागितली लेकीची माफी, म्हणाल्या माझीच चूक..
Neena Gupta, Masaba Gupta and Vivian Richards
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 8:05 AM

अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. आता त्यांनी मुलगी मसाबा गुप्ता हिला तिचे वडील आणि माजी वेस्ट इंडिज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दल सत्य कशा पद्धतीने सांगितलं, याचा खुलासा केला आहे. मसाबा लहान असताना तिच्या आयुष्यात वडिलांची उपस्थिती नव्हती, याबद्दल नीना यांनी लेकीची माफी मागितल्याचंही सांगितलं. नीना गुप्ता यांनी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मसाबाचा जन्म झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांबद्दल सत्य सांगणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. मात्र हे सत्य एका दिवसात किंवा अचानक सांगण्याऐवजी त्यांनी मसाबाच्या वयाचा आणि समजुतीचा विचार केला.

मसाबाने जेव्हा जेव्हा वडिलांबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा नीना यांनी परिस्थितीनुसार तिला हळूहळू माहिती दिली. विशेष म्हणजे, वडिलांबद्दल सत्य सांगताना मुलीच्या मनात कोणताही द्वेष निर्माण होऊ नये, याचीही काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. नीना यांच्या मते, मुलांना कुटुंबातील गुंतागुंतीच्या परिस्थितीबद्दल सत्य सांगणं गरजेचं असतं. मात्र ते सत्य कशा पद्धतीने आणि कोणत्या वयात सांगितलं जातं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

मसाबाला सत्य सांगताना त्यांनी तिच्या वडिलांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली. मसाबा मोठी झाल्यानंतर परिस्थितीमागची कारणंही तिला समजावून सांगितली. त्यामुळे आज त्यांच्या नात्यात या विषयावरून कटुता नसल्याचं नीना यांनी सांगितलं. या मुलाखतीतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे नीना यांनी मुलगी मसाबाची मागितलेली माफी. “तू लहान असताना तुझ्याबरोबर तुझे वडील नव्हते,” असं म्हणत त्या अनेकदा मसाबाची माफी मागतात, असं त्यांनी सांगितलं. “ही माझी चूक आहे, पण ती समजून घेते. आपण सगळेच चुका करतो,” असंही नीना यांनी म्हटलं. त्यांचं आणि मसाबाचं नातं विश्वासावर आधारलेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

विवियन रिचर्ड्स यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नाही. या दोघांच्या नात्यातून मसाबाचा जन्म झाला. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये नीना यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिच्या दुसऱ्या लग्नाला वडील विवियनसुद्धा उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us