Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा हिचा अपघात, अभिनेत्री रुग्णालयात दाखल; आठवड्यापूर्वी…
Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बालीमध्ये अपघात झाला असून अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झाला असून या अपघातात ती जखमी झाली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिच्या अपघाताची तीव्रता अद्याप समजलेली नाही.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नुसरत कामासाठी बालीला गेली होती आणि तिथे तिचा अपघात झाला. उपचारासाठी नुसरतला बालीमधील मुक्काम वाढवावा लागला आहे. अपघाताच्या सुमारे आठवड्याभरापूर्वी, नुसरतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.
नुसरत टायगर श्रॉफच्या आगामी सिनेमाचा भाग असणार आहे. टायगर आणि नुसरतची ऑन-स्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘टीम अशा अभिनेत्रीच्या शोधात होती जी कथेला साजेशी असेल आणि भावनिक खोली देऊ शकेल.’ या चित्रपटात पश्मिना रोशन, अभिषेक बॅनर्जी आणि एलविश यादव हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
यापूर्वीही झालेला अभिनेत्रीचा अपघात
२०२३ मध्ये, नुसरत भरुचा शूटिंगदरम्यान दोनदा जखमी झाली. एप्रिल २०२३ मध्ये, ‘अकेली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नुसरत भरुचाचा अपघात झाला. एका सीनमध्ये तिला धावायचं होतं, आणि ती संगमरवरी फरशीवर डोक्यावर पडली. अपघातानंतर नुसरत अर्धा तास वेदनेने रडत होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तसेच जानेवारी २०२३ मध्ये, ‘छोरी २’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, एका ॲक्शन सीनचं शूटिंग करताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर जखम झाली. ही जखम इतकी गंभीर होती की तिच्या चेहऱ्यावर आणि भुवयांवर टाके घालावे लागले. यापूर्वी, ऑगस्ट २०२१ मध्ये, चित्रीकरणादरम्यान नुसरतची तब्येत अचानक खालावली. जवळपास २३-२४ दिवस सतत काम केल्यामुळे ती खूप थकली होती. घटनेच्या दिवशी, तिला चक्कर येऊ लागली आणि ती नीट उभी राहू किंवा बोलू शकत नव्हती. त्यानंतर तिला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर नुसरतला घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांनी नुसरतला १५ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. यामुळे चित्रपटाचे चित्रीकरणही थांबवण्यात आलं.
