Rahul Mahajan : दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा वयाच्या 51व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करणार? म्हणाला, मी तिला…
Rahul Mahajan On Marriage : राहुल महाजन एका मुलाखतीमुळे चर्चेत आला असून त्यानं चौथ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिवंग नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्यानं आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. रिॲलिटी शो स्टार राहुल महाजनच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्यानं तीन वेळा लग्न केलं, पण प्रत्येक वेळी त्याचं नातं अयशस्वी ठरलं. पण तुम्हाला माहित आहे का, तीन अयशस्वी लग्नांनंतरही राहुलचा विश्वास डगमगला नाही. त्याचा आजही प्रेमावर विश्वास आहे.
चौथ्या लग्नाबद्दल काय म्हणाला राहुल महाजन?
सुभोजित घोषच्या पॉडकास्टमध्ये राहुलला त्याच्या चौथ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. त्याचं उत्तर कदाचित चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. राहुल म्हणाला, ‘मला चौथ्यांदा लग्न करायचं आहे. जगात फक्त माझाच लग्नावर विश्वास आहे. आजच्या पिढीतील अनेक लोकांना लग्न करायचं नाही. पण मी तसा नाही. जर मला कोणी आवडलं, तर मी तिचा विचार करेन. मी तिला जाणून घेईन आणि तिच्यासोबत सहा महिने किंवा एक वर्ष राहीन. मी चौथ्यांदा लग्न का करू नये? मी हार का मानावी?’
‘जर मी म्हणालो की, मी चौथ्यांदा लग्न करणार नाही, तर याचा अर्थ असा होईल की माझी सगळी दुःखं व्यर्थ गेली. माणसानं कधीही आशा सोडू नये. मला प्रेमकथा नक्कीच आवडतात.’ असंही राहुल शेवटी म्हणाला.
याच मुलाखतीत राहुल महाजन म्हणाला की, वडिलांच्या निधनानंतर त्याला वाटलं होतं की, आयुष्यात यापेक्षा वाईट काळ कधीच येणार नाही. मात्र, परिस्थिती आणखी कठीण झाली. त्यानं सांगितलं की, वडिलांच्या निधनानंतर जवळपास एका महिन्याच्या आत त्याला तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं.
दरम्यान, राहुलचं पहिलं लग्न २००६ मध्ये श्वेता सिंगसोबत झालं होतं. त्याचं दुसरं लग्न टीव्हीवरील डिंपी महाजनसोबत झालं. पण, त्यांचा पाच वर्षात घटस्फोट झाला. राहुलचं तिसरं लग्न २०१८ मध्ये कझाकस्तानी मॉडेल नतालिया इलिनासोबत झालं होतं. त्यांचा 2023 मध्ये घटस्फोट झाला आणि तेव्हापासून राहुल सिंगल आहे.
