अवघ्या 0.2 सेकंदाने हुकलं आर. माधवनच्या मुलाचं फायनलचं तिकीट; आशियाई स्पर्धेतील अपयशानंतर नाराजी

आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने 21 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण केलं. पण यात त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशानंतर आर. माधवनची पोस्ट चर्चेत आली आहे.

अवघ्या 0.2 सेकंदाने हुकलं आर. माधवनच्या मुलाचं फायनलचं तिकीट; आशियाई स्पर्धेतील अपयशानंतर नाराजी
आर. माधवन आणि त्याचा मुलगा वेदांत
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2026 | 10:55 AM

अभिनेता आर. माधवनचा मुलगा आणि युवा जलतरणपटू वेदांत माधवन याने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदार्पण केलं. मात्र पुरुषांच्या 4×200 मीटर फ्रीस्टाइल रिलेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचं त्याचं आणि भारतीय संघाचं स्वप्न अगदी थोडक्यात हुकलं. भारतीय संघाने पात्रता फेरीत नवव्या क्रमांकावर समाधान मानलं. अवघ्या 0.2 सेकंदांच्या फरकाने अंतिम फेरीचं तिकीट हुकल्याने हा निकाल वेदांतसाठी नक्कीच निराशाजनक ठरला. वेदांतने साजन प्रकाश, धक्षन शशिकुमार आणि अनीश सुनील यांच्यासोबत 4×200 मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये सहभाग घेतला. भारतीय चौकडीने 7 मिनिटे 24.32 सेकंदांची वेळ नोंदवत 13 संघांमध्ये नववा क्रमांक मिळवला.

अंतिम फेरीसाठी पहिल्या आठ संघांना पात्रता मिळणार होती. आठव्या क्रमांकावर असलेल्या कतारने 7:24.10 अशी वेळ नोंदवली. त्यामुळे भारत आणि कतारमध्ये केवळ 0.22 सेकंदांचा फरक राहिला. या कामगिरीनंतर वेदांतने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर फायनल अवघ्या 0.2 सेकंदांनी हुकल्याचं नमूद केलं. त्याचबरोबर पुढील 200 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेकडे आपलं लक्ष असल्याचंही त्याने सांगितलं. वेदांतची ही पोस्ट आर. माधवनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि त्यासोबत प्रार्थनेचे इमोजी पोस्ट केले.

वेदांत आणि माधवनची पोस्ट-

मुलाच्या या कामगिरीवर माधवनची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी त्याने वेदांतच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, वेदांतचा आशियाई स्पर्धेतील प्रवास अद्याप संपलेला नाही. त्याच्या पुढे 23 सप्टेंबरला 200 मीटर फ्रीस्टाइल आणि 25 सप्टेंबरला 200 मीटर बॅकस्ट्रोक या वैयक्तिक स्पर्धा आहेत. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांमध्ये वेदांतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

वेदांतने याआधीही जलतरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने विविध स्पर्धांमध्ये पदकं मिळवली असून 2026 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभाग हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. दरम्यान, आर. माधवनने यापूर्वी अपयशाकडे पाहण्याची आपली वेगळी भूमिका व्यक्त केली आहे. त्याच्या मते, अपयश म्हणजे केवळ पराभव नसून पुढच्या प्रयत्नांसाठी मिळणारा अनुभव आणि शिकवण असते. वेदांतच्या बाबतीतही अंतिम फेरी काही क्षणांनी हुकली असली, तरी पुढील दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये त्याला पुन्हा संधी मिळणार आहे. त्यामुळे आता त्याच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us