R. Madhavn : गाई कापणाऱ्यांसोबत राहिलो… सर्वांसोबत अंडरवेअरवर अंघोळ केली… अभिनेता माधवन म्हणतो, आता मला…

अभिनेता आर. माधवनने कॅनडामधील विद्यार्थी जीवनातील आपले अनुभव नुकतेच सांगितले. शाकाहारी असल्याने गाईंची कत्तल करणाऱ्या कुटुंबासोबत राहण्याचा आणि बास्केटबॉल स्पर्धेतील सार्वजनिक शॉवरचा अनुभव त्याच्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता. या प्रसंगांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम केला, ज्यामुळे त्याला स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्याचा महत्त्वाचा जीवन धडा मिळाला.

R. Madhavn : गाई कापणाऱ्यांसोबत राहिलो... सर्वांसोबत अंडरवेअरवर अंघोळ केली... अभिनेता माधवन म्हणतो, आता मला...
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 6:33 PM

‘धुरंधर’मधील गाजलेल्या भूमिकेमुळे अभिनेता आर. माधवन सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच्या काळात त्याला काही असे अनुभव आले, ज्यांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम केला. अभिनयात येण्यापूर्वी माधवनला रोटरीच्या माध्यमातून एक्सचेंज विद्यार्थी म्हणून कॅनडात जाण्याची संधी मिळाली होती. 2023 मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या YouTube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने कॅनडातील या वास्तव्याच्या आठवणी सांगितल्या होत्या.

माधवन कॅनडातील स्टेटलर या छोट्या शहरात गेला होता. त्याच्या मते, हे ठिकाण ‘वाइल्ड वाइल्ड वेस्ट’सारखं होतं आणि तिथे काउबॉय संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. मात्र, तिथली जीवनशैली त्याच्यासाठी काहीशी धक्कादायक ठरली. तो ज्या कुटुंबासोबत राहत होता, त्यांच्या उदरनिर्वाहाचा संबंध पशुपालन आणि गायींच्या कत्तलीशी होता. स्वतः पूर्णपणे शाकाहारी असलेल्या माधवनसाठी हे वातावरण त्याच्या संस्कारांपेक्षा अगदी वेगळं होतं.

बास्केटबॉल टीममध्ये झाली निवड

कॅनडातील त्याच्या आठवणींमध्ये बास्केटबॉल टीमशी संबंधित अनुभव विशेष महत्त्वाचा आहे. स्टेटलरमधील स्थानिक शाळेच्या बास्केटबॉल टीममध्ये त्याची निवड झाली होती. तो इतर मुलांच्या तुलनेत फार उंच नव्हता आणि भारतीय विद्यार्थी असूनही टीममध्ये स्थान मिळणं त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती.एका सात दिवसांच्या स्पर्धेसाठी टीमसोबत दुसऱ्या शहरात गेल्यानंतर मात्र त्याच्यासमोर वेगळीच अडचण उभी राहिली.

सगळ्यांसमोर शॉवर घेण्याची वेळ

सामने संपल्यानंतर सर्व खेळाडू लॉकर रूममध्ये परतायचे आणि एकत्र शॉवर घ्यायचे. पुरुषांच्या शॉवर एरियामध्ये एका खांबाभोवती सहा शॉवर असल्याने सर्वजण एकाच वेळी आंघोळ करायचे. तिथल्या मुलांसाठी ही अगदी सामान्य बाब होती. मात्र, दक्षिण भारतीय कुटुंबातील संस्कारांमध्ये वाढलेल्या माधवनसाठी हा अनुभव अस्वस्थ करणारा होता. घरातही कपडे काढून वावरण्याची त्याला सवय नव्हती. त्यामुळे सामना खेळण्यापेक्षा शॉवरमध्ये जाण्याचीच त्याला अधिक भीती वाटू लागली. शेवटी त्याने स्वतःचा मार्ग निवडला. इतर सर्व खेळाडू कपडे काढून शॉवर घेत असताना माधवन मात्र अंडरवेअर घालूनच शॉवर घेत असे.

हा नेमकं काय लपवतोय?

माधवनच्या या वागण्यामुळे टीममधील इतर मुलांचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. सर्वजण कपड्यांशिवाय शॉवर घेत असताना माधवन मात्र अंडरवेअर घालून उभा राहत असल्याने त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. ‘हा नेमकं काय लपवत आहे?’ असा प्रश्न त्यांना पडायचा. हा प्रकार एका-दोन दिवसांचा नव्हता. सलग सात दिवस माधवनने आपला निर्णय कायम ठेवला. सुरुवातीला त्याने त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्या दिवशी त्याला जाणवलं की ही गोष्ट त्याच्या स्वभावाशी आणि मूल्यांशी जुळणारी नाही. त्यामुळे ‘हे माझ्यासाठी नाही आणि मला यात कधीच सहज वाटणार नाही,’ असा निर्णय त्याने घेतला.

त्यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने इतरांचं अनुकरण न करता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचा मार्ग निवडला.

माधवनला मिळाला महत्त्वाचा धडा

माधवनच्या मते, कॅनडातील हा अनुभव त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा धडा ठरला. एखाद्या समाजात किंवा समूहात एखादी गोष्ट सामान्य मानली जात असली, तरी ती आपल्याला योग्य वाटत नसेल तर केवळ इतर जण ती करतात म्हणून आपणही ती स्वीकारण्याची गरज नाही. स्वतःच्या मूल्यांवर आणि निर्णयांवर ठाम राहण्याचा हा धडा त्याला त्या काळात मिळाला आणि त्याचा पुढील आयुष्यावरही मोठा प्रभाव पडला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us