चालत्या ट्रेनमध्ये शूट झालेलं हे रोमँटिक गाणं, 52 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही अनेकांच्या..
ट्रेनच्या छतावर शूट झालेलं राजेश खन्ना-जीनत अमान यांचं रोमँटिक गाजलेलं गाणं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामुळे आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला.

70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपट आणि गाण्यांची मोठी क्रेझ होती. या काळातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. असंच एक सदाबहार रोमँटिक गाणं म्हणजे ‘हम दोनों दो प्रेमी’. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजनबी चित्रपटातील हे गाणं आजही विशेष चर्चेत आहे. या गाण्याची खासियत म्हणजे त्याचं चित्रीकरण एखाद्या सुंदर लोकेशनवर किंवा भव्य सेटवर नाही तर चक्क धावत्या ट्रेनच्या छतावर करण्यात आलं होतं.
अजनबीमध्ये राजेश खन्ना आणि जीनत अमान पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसले. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. चित्रपटातील ‘भीगी भीगी रातों में’, ‘एक अजनबी हसीना से’ आणि ‘हम दोनों दो प्रेमी’ ही रोमँटिक गाणी विशेष गाजली.
‘हम दोनों दो प्रेमी’ हे गाणं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले असून त्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले आणि संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं. दोन प्रेमी जगाची पर्वा न करता आपल्या प्रेमाच्या दिशेने निघाले आहेत असा या गाण्याचा भाव आहे.
धावत्या ट्रेनच्या छतावर झालं शूटिंग
या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं शूटिंग. राजेश खन्ना आणि जीनत अमान यांचा रोमँटिक अंदाज धावत्या ट्रेनच्या छतावर शूट करण्यात आला होता. त्यामुळे गाण्याला एक वेगळाच रोमांच आणि प्रवासाची अनुभूती मिळते.
गाण्यातील प्रेम, प्रवास आणि दोघांमधील संवाद यामुळे हे गाणं इतर रोमँटिक गाण्यांपेक्षा वेगळं ठरतं. आजही हे गाणं ऐकल्यावर अनेकांना जुन्या काळातील ट्रेन प्रवासाच्या आठवणी जाग्या होतात.
‘अजनबी’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज
अजनबी चित्रपटाचं दिग्दर्शन शक्ती सामंता यांनी केलं होतं तर कथा गुलशन नंदा यांची होती. चित्रपटात राजेश खन्ना यांनी रोहित कुमार सक्सेना तर जीनत अमान यांनी रश्मीची भूमिका साकारली होती. याशिवाय प्रेम चोप्रा, असरानी, योगिता बाली, मदन पुरी आणि असित सेन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
1974 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज अनेक दशकांनंतरही आपल्या गाण्यांमुळे आठवणीत आहे. विशेषतः ‘हम दोनों दो प्रेमी’ हे राजेश खन्ना-जीनत अमान यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसह लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामुळे अजरामर ठरलं आहे.