सुपरस्टारची मुलगी असूनही अभिनेत्री झाली नाही, या कामाने सुरू केले करिअर, नंतर बनल्या दिग्दर्शक
एका सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीने करिअरच्या सुरुवातीला फिल्म इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली होती. तिने डिझायनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या पिढ्यान पिढ्या या त्याच क्षेत्रात काम करताना दिसतात. पण काही कलाकार असे आहेत ज्यांनी त्यांची कारकिर्द गाजवली. ते सुपरस्टार ठरले. पण त्यांच्या मुलांनी मात्र सुरुवातीला फिल्म इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली. आम्ही अशाच एका अभिनेत्याच्या मुलीविषयी बोलत आहे. तिने सुरुवातीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यास नकार दिला होता. आता हा अभिनेता कोण आहे? त्याची मुलगी कोण आहे? चला जाणून घेऊया…
आम्ही रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत विषयी बोलत आहेत. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९८४ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील रजनीकांत साउथ सिनेमाचे मोठे सुपरस्टार आहेत आणि चाहते त्यांना प्रेमाने ‘थलाइवा’ म्हणतात. त्यांच्या आईचे नाव लता रजनीकांत आहे. सौंदर्या यांची मोठी बहिण ऐश्वर्या रजनीकांतही चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.
चित्रपटातील कुटुंबातील असूनही सौंदर्या यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय निवडला नाही. त्यांनी ग्राफिक डिझायनिंगने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या आपले वडील रजनीकांत यांच्या चित्रपटांसाठी टायटल सिक्वेन्स डिझाइन करत होत्या.
वडील रजनीकांत यांच्याविषयी बनवली चित्रपट
सौंदर्याने हळूहळू चित्रपट निर्मितीच्या जगात पाऊल ठेवले आणि निर्माता म्हणूनही काम करू लागल्या. २०१० साली आलेल्या ‘गोवा’ या चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. सौंदर्या ‘ओचर पिक्चर प्रोडक्शन्स’ या चित्रपट निर्मिती कंपनीच्या संस्थापकही आहेत. सौंदर्या यांनी दिग्दर्शक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. त्यांनी वडील रजनीकांत यांच्याविषयी मोशन-कॅप्चर अॅनिमेटेड चित्रपट ‘कोचाडाइयां’चे दिग्दर्शन केले होते. हा भारतातील पहिल्या मोशन-कॅप्चर ३डी चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटात रजनीकांत यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सौंदर्या यांनी ‘वेलैइल्ला पट्टाधारी २’ म्हणजेच ‘व्हीआयपी २’चे दिग्दर्शन केले. हा तमिळ आणि तेलुगूमध्ये बनलेला अॅक्शन-कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. यात धनुष आणि काजोल मुख्य भूमिकांमध्ये दिसले होते.
सौंदर्या यांचे वैयक्तिक जीवनही अनेकदा चर्चेत राहिले आहे. त्यांनी ३ सप्टेंबर २०१० रोजी उद्योजक अश्विन रामकुमार यांच्याशी विवाह केला होता. दोघांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव वेद आहे. मात्र, २०१७ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सौंदर्या यांनी ११ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्योजक विषगन वनंगमुडी यांच्याशी दुसरा विवाह केला. सप्टेंबर २०२२ मध्ये दोघे एका मुलाचे आई-वडील बनले.
सौंदर्या यांनी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याऐवजी पडद्यामागे राहून सिनेमात आपली जागा निर्माण केली आणि ग्राफिक डिझायनिंगने सुरू झालेला त्यांचा प्रवास चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनापर्यंत पोहोचला.