पत्नीला कॅन्सर झालेला तरीही..; उज्ज्वल निकम यांच्याविषयी राजकुमार रावचा खुलासा

'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव हा उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारतोय. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ज्योती निकम यांच्याविषयी हा खुलासा केला आहे.

पत्नीला कॅन्सर झालेला तरीही..; उज्ज्वल निकम यांच्याविषयी राजकुमार रावचा खुलासा
Ujjwal Nikam and Rajkummar Rao
Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 07, 2026 | 4:11 PM

‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्याचा वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. दहशतवाद आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडणारे उज्ज्वल निकम यांचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत राहिलं, तितकंच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी माहिती समोर आली आहे. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही भावनिक क्षण उलगडले आहेत. चित्रपटात राजकुमार राव उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री वामिका गब्बी ही त्यांची पत्नी ज्योती निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त राजकुमार रावने टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ज्योती निकम यांच्या आयुष्यातील एका अत्यंत संवेदनशील प्रसंगाचा खुलासा केला.

राजकुमार रावने सांगितलं की, उज्ज्वल निकम यांचं आयुष्य एखाद्या रोलर-कोस्टर राइडसारखं आहे. एकीकडे देशाचं लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी आणि दुसरीकडे कुटुंबातील वैयक्तिक संकटं, अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांना एकाच वेळी झगडावं लागलं. ज्योती निकम यांना कॅन्सर झाल्याचं त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं, असं राजकुमार रावने या मुलाखतीत सांगितलं. एका बाजूला संपूर्ण जगाचं लक्ष असलेली केस आणि दुसऱ्या बाजूला पत्नीच्या आजाराची चिंता, हा काळ अत्यंत भावनिक होता, ते भावनिक क्षण पडद्यावर साकारणं आव्हानात्मक असल्याचं त्याने नमूद केलं.

Loading...

‘तुला सांसारिक सुख देऊ शकलो नाही…’

दरम्यान, याच मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी पत्नी ज्योती निकम यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या आहेत. आपल्या आयुष्यात आदर आणि पैसा खूप कमावला, मात्र सांसारिक सुख पत्नीला देऊ शकलो नाही, अशी भावनिक कबुली त्यांनी दिली. कामाच्या व्यापामुळे दोघांना एकत्र बाहेर जाण्यासाठीही फारसा वेळ मिळाला नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र आपल्या पत्नीने त्यांच्या व्यस्त आणि आव्हानात्मक कारकिर्दीत दिलेल्या साथीसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आज ज्योती निकम अभिमानाने आपण उज्ज्वल निकम यांची अर्धांगिनी असल्याचं सांगू शकतात, असंही त्यांनी म्हटलं. वडील म्हणून मुलांना पुरेसा वेळ देता आला नाही, अशी खंतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. देशातील मोठमोठ्या खटल्यांसाठी आयुष्य झोकून देताना कुटुंबाला द्यायचा वेळ कुठेतरी कमी पडला, ही जाणीव त्यांच्या या कबुलीतून दिसून येते.

‘प्रहार’मध्ये ज्योती यांची भूमिका महत्त्वाची

उज्ज्वल निकम यांनी चित्रपटात ज्योती निकम यांच्या व्यक्तिरेखेलाही महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. त्यांच्या सहनशीलतेचा आणि सोशिकतेचा प्रवास ‘प्रहार’मध्ये पाहायला मिळणार आहे. वामिका गब्बी ही भूमिका साकारत असल्याने तिच्याकडून प्रेक्षकांना ज्योती निकम यांचा वेगळा पैलू पाहायला मिळणार आहे.

राजकुमार रावने या मुलाखतीत असंही स्पष्ट केलं की, चित्रपटात उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केलेले संवाद जसेच्या तसे घेतलेले नाहीत. कथानक प्रभावी करण्यासाठी काही प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us