‘ड्रामा करू नका, कोर्टातही अॅक्टिंग?’ राजपाल यादववर सुप्रीम कोर्ट नाराज, दिली शेवटची संधी
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाकडून अखेरची 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. बँक चेक बाऊन्स प्रकरणात 2 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून शेवटची सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. चेक बाऊन्सच्या अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या राजपाल यादवला थकीत रक्कम भरण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांची शेवटची मुदत दिली आहे. या काळात थकीत रक्कम भरण्यासाठी ठोस प्रस्ताव सादर करण्यासोबतच 2 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन झाले नसल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच राजपाल यादवच्या भूमिकेमुळे विश्वास निर्माण होत नसल्याचेही खंडपीठाने म्हटले. दरम्यान, त्याला आत्मसमर्पण करण्यापासून मिळालेली सूट 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणांचं आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 2010 मध्ये एका चित्रपटासाठी राजपाल यादवला 5 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतर रक्कम परत करण्याच्या करारानुसार 2013 मध्ये राजपाल यादवला 1.05 कोटी रुपयांचे सात चेक दिले. मात्र हे सर्व चेक बाऊन्स झाले.
2012 मध्ये झालेल्या करारानुसार राजपाल यादव, त्याची पत्नी आणि त्याच्या कंपनीने व्याजासह जवळपास 11 कोटी रुपये परत करण्याचे मान्य केले होते असा दावा करण्यात आला आहे.
कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील अजित सिन्हा यांनी न्यायालयात सांगितले की, त्याला केवळ थकीत रक्कम मिळण्याशी मतलब आहे. राजपाल यादवने यापूर्वी पैसे भरण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजपाल यादवच्या वकिलांनी मागितली दोन आठवड्यांची मुदत
राजपाल यादवच्या वतीने ज्येष्ठ वकील पी.एस. पटवालिया यांनी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला. या कालावधीत थकीत रक्कम भरण्यासाठी ठोस प्रस्ताव सादर केला जाईल असं त्यांनी सांगितलं. तसेच राजपाल यादव आपली आर्थिक बांधिलकी आणि पैसे भरण्याची तयारी दाखवण्यासाठी 2 कोटी रुपये जमा करणार असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल यादवला यापूर्वी जवळपास साडेचार महिने तुरुंगात राहावे लागले आहे. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील त्याच्या मित्रांनी त्याला जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली होती. आता पुढील सुनावणी 5 ऑक्टोंबरला होणार आहे.