हानिया आमिरच्या गाण्यातून राखी सावंतचं पदार्पण, रॅप ऐकून चाहते थक्क

हानिया आमिरच्या पहिल्या रॅप गाण्यात राखी सावंतचा सरप्राइज; दोघींचं अनोखं कोलॅबोरेशन पाहून चाहतेही थक्क. सोशल मीडियावर रॅपची जोरदार चर्चा.

हानिया आमिरच्या गाण्यातून राखी सावंतचं पदार्पण, रॅप ऐकून चाहते थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 11, 2026 | 3:07 PM

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिने आपल्या पहिल्या गाण्याच्या माध्यमातून संगीतविश्वात पाऊल ठेवलं आहे. गुरुवारी तिचं ‘पाब्लो’ हे पहिलं रॅप सॉन्ग रिलीज झालं. विशेष म्हणजे, या गाण्याच्या शेवटी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिची स्पेशल गेस्ट अपिअरन्स पाहायला मिळते. हानिया आणि राखीचं हे अनपेक्षित कोलॅबोरेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘पाब्लो’ हे गाणं हानियाने स्वतः लिहिलं आणि कंपोज केलं आहे. या गाण्यात तिने तिच्यावर टीका करणाऱ्या लोकांना थेट उत्तर दिलं आहे. सुंदर असल्यामुळे आपण बनावट आहोत किंवा आपल्या खासगी आयुष्याबाबत जास्त सावध असतो, अशा टीकाकारांच्या विचारांना हानियाने आपल्या गाण्यातून प्रत्युत्तर दिलं आहे.

आपलं आयुष्य आपल्या अटींवर जगत असल्याचं सांगत हानियाने टीकाकारांना आपल्या कामाची चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येकजण माणूस आहे, त्यामुळे आधी दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या, असा संदेशही ती गाण्यातून देते. टीका करणाऱ्यांनी आपली मर्यादा ओलांडू नये, असा इशाराही हानियाने दिला आहे.

गाण्याच्या शेवटी राखी सावंतचा धमाका

गाण्याच्या अखेरीस चाहत्यांना सर्वात मोठा सरप्राइज मिळतो. राखी सावंत हानियासाठी एक खास संदेश देताना दिसते. तिने हानियाच्या सौंदर्याचं कौतुक करत तिला टीका मनावर न घेण्याचा सल्ला दिला.

राखीने हानियाला ‘शेरनी’ म्हणत धाडसाने टीकाकारांचा सामना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिच्या खास अंदाजातील या संदेशामुळे गाण्याच्या चर्चेत आणखी भर पडली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हानिया आणि राखीचं हे अनपेक्षित कोलॅबोरेशन पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी दोघींच्या या जोडीवर मजेशीर आणि उत्साहपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी हे कोलॅबोरेशन 2026 मधील सर्वात अनपेक्षित गोष्टींपैकी एक असल्याचं म्हटलं तर काहींनी राखीचा अंदाज आणि हानियाचं गाणं दोन्ही आवडल्याचं सांगितलं.

राखी सावंतनेही या कोलॅबोरेशनवरील चाहत्यांच्या प्रतिक्रिया आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या आहेत. एका व्हिडीओमध्ये ती हानियाचं ‘पाब्लो’ गाणं एन्जॉय करतानाही दिसली.

हानिया आमिरची लोकप्रियता

हानिया आमिर ही पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने 2016 मध्ये ‘जानन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘तितली’, ‘विसाल’, ‘मेरे हमसफर’ आणि ‘कभी मैं कभी तुम’ यांसारख्या मालिकांमधून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिचा ‘मेरी जिंदगी है तू’ हा शोही चर्चेत राहिला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us