Raksha Bandhan: दाऊदला राखी बांधणारी बॉलिवूड अभिनेत्री कोण? आदित्य पांचोलीच्या वक्तव्याने नेटकरीही चकीत
Dawood Ibrahim: आदित्य पांचोलीचा राग फक्त या एका अफवेपुरता मर्यादित नव्हता. त्याच्यावरील इतर आरोपांवरही त्याने प्रतिक्रिया दिली होती. केवळ आरोप झाल्याने माणूस कोण आहे हे ठरत नाही, असं तो म्हणाला होता.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूडमधील एक जुनी आणि चर्चेत राहिलेली अफवा पुन्हा समोर आली आहे. अभिनेता आदित्य पांचोलीची पत्नी आणि अभिनेत्री जरीना वहाब अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला राखी बांधत असल्याचा दावा अनेक वर्षांपासून केला जात होता. एवढंच नाही, तर या कथित नात्यामुळेच आदित्य पांचोलीचा बॉलिवूडमध्ये दबदबा असल्याची चर्चाही रंगली होती. यावर खुद्द आदित्य पांचोलीने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “जरीना वहाब दाऊद इब्राहिमला राखी बांधते, अशी बातमी अनेकदा प्रसिद्ध झाली. या अफवेमुळे माझ्या पत्नीचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. विशेष म्हणजे, जरीना मुस्लिम असल्याचा संदर्भ घेत ही अफवा पसरवली गेली,” असं पांचोलीने सांगितलं.
एका कार्यक्रमात बोलताना आदित्यने या दाव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या मते, जरीना वयाच्या 17व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत आणि त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही. त्याने पत्नीचा बचाव करत तिला अत्यंत पवित्र आणि आदरणीय व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. या अफवेवर प्रतिक्रिया देताना आदित्य पांचोलीने माध्यमांवरही संताप व्यक्त केला होता. काही वृत्तांमध्ये त्याचा बॉलिवूडमधील प्रभाव आणि जरीनाचं कथित दाऊदशी असलेलं नातं यांची सांगड घातली जात होती. त्याने अशा बातम्यांवर प्रश्न उपस्थित करत मुस्लिम महिलेनं दाऊद इब्राहिमला राखी बांधल्याची कथा कशी जोडली गेली, याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
पांचोलीने यावेळी त्याच्यावर होणाऱ्या इतर आरोपांबाबतही भाष्य केलं होतं. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला म्हणून तो आरोप खरा ठरत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचवेळी त्याने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर त्याच्याकडूनही चुका झाल्याचं मान्य केलं होतं. मात्र, चुका आणि गुन्ह्याचे आरोप या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्याने स्पष्ट केलं.
आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांची ओळख 1986 मध्ये ‘कलंक का टीका’च्या सेटवर झाली होती. शूटिंगदरम्यान दोघं जवळ आले आणि पुढे त्यांच्या नात्याचं रूपांतर लग्नात झालं. दोघांनी 1986 मध्ये लग्न केलं असून त्यांना मुलगा सूरज पांचोली आणि मुलगी सना पांचोली आहेत.