
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा भरभरून बोलत आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. अशातच त्यांनी या चित्रपटाबद्दल आणखी एक पोस्ट लिहित बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींवर थेट निशाणा साधला आहे. ‘धुरंधर 2’ इतकं यश मिळवत असताना इंडस्ट्रीतील काही लोक अजूनही त्यावर गप्प का आहेत, असा सवाल राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर ‘प्रोपगेंडा’ची टीका करणाऱ्यांनाही त्यांनी फटकारलं आहे. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
‘आता जेव्हा आदित्य धरने चित्रपटसृष्टीतच अणुबॉम्ब टाकला आहे, तेव्हा बाकीच्या चित्रपटसृष्टीकडून येणारी ही भयाण शांतता धक्कादायक आहे. ‘धुरंधर 2′च्या विनाशकारी स्फोटाने चित्रपटसृष्टीतील इतरांना इतक्या दूर फेकून दिलं आहे की लांब अंतरामुळे त्यांच्या टाळ्यांची दाद इथपर्यंत पोहोचू शकत नाही, यामुळे हे असं आहे का मला माहीत नाही. किंवा ते सत्य स्वीकारायला तयार नाहीत आणि एकमेकांमध्येच कुजबुजत आहेत की हा निव्वळ प्रोपगेंडा (प्रचार) आहे, लवकरच ही लाट ओसरून जाईल. जेणेकरून ते पुन्हा त्याच जुन्या, त्याच-त्याच प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती सुरू करू शकतील. किंवा ते चित्रपटाच्या निव्वळ उत्कृष्टतेने इतके भारावून गेले आहेत की त्यांना आता हे जाणवलंय की, ते आतापर्यंत जे काही बनवत होते किंवा बनवण्याची योजना आखत होते, ते आता त्याच्या तोलामोलाचं नाही,’ अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.
Now that @AdityaDharFilms has EXPLODED a ATOMIC BOMB right under the film industry, what is shocking is the loud silence from the rest of the film industry .
I don’t know whether this is because the #Dhurandhar2 ‘s devastating explosion has hurled everyone else in the film…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 29, 2026
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ”धुरंधर 2’सारख्या डायनासोरकडे दुर्लक्ष करणं अत्यंत मूर्खपणाचं नाही का? जो तुमच्या डोळ्यांत आग ओकतोय आणि ज्याची बॉक्स ऑफिसवरील गर्जना पायाखालची जमीन हादरवत आहे. याकडे दुर्लक्ष करणारा कोणी इतका मूर्ख कसा असू शकतो? चित्रपटसृष्टीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझा मनापासूनचा सल्ला आहे की, कृपया धुरंधर 2 या चित्रपटाला अत्यंत गांभीर्याने घ्या. चित्रपटनिर्मितीचा एखादा अगदीच नवा आणि फ्रेश अभ्यासक्रम असल्याप्रमाणे त्याचा सखोल अभ्यास करा आणि स्वत:ला अपडेट करून ध्या. अन्यथा 19 मार्च 2026 च्या आधीच्या चित्रपटांच्या स्मशानभूमीत कायमचे गाडले जाण्याचा धोका पत्करण्यास तयार राहा.’