मोठी बातमी! रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी; तो एक निर्णय पडला महागात

अभिनेता रणवीर सिंहबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) त्याच्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..

मोठी बातमी! रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी; तो एक निर्णय पडला महागात
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2026 | 9:09 AM

अभिनेता रणवीर सिंहविरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) मोठी कारवाई केली आहे. FWICE ने त्याच्यावर थेट बंदी घातली असून त्याच्याविरोधात असहकाराचा आदेश जारी केला आहे. इतकंच नव्हे संपूर्ण चित्रपटसृष्टीला त्याच्यासोबत काम न करण्यास सांगण्यात आलं आहे. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याने अचानक माघार घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रणवीरने अचानक माघार घेतल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. काही दिवसांपासून रणवीर आणि निर्मात्यांमध्ये क्रिएटिव्ह मतभेद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या मतभेदांमुळे रणवीरने शूटिंगपूर्वीच चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

मतभेद का?

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरला ‘डॉन’ या भूमिकेचा अधिक डार्क आणि आक्रमक अंदाज हवा होता. मात्र दिग्दर्शक फरहान अख्तरची भूमिका वेगळी असल्याने दोघांमध्ये एकमत होत नव्हतं. यामुळे चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच रणवीरने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. ‘डॉन 3’ची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननंतर रणवीर सिंह या लोकप्रिय फ्रँचाइझीमध्ये डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपट चर्चेत होता. मात्र आता रणवीरच्या एक्झिटनंतर नव्या अभिनेत्याच्या शोधाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फेडरेशनच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट गेल्या तीन वर्षांपासून निर्मितीच्या प्रक्रियेत होता. डॉन 3 या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याचे सहकारी रितेश सिधवानी यांनी रणवीरविरोधात इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर असोसिएशनने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडे पाठवलं. सध्या डॉन 3 च्या वादात FWICE मध्यस्थी करत आहे. या फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच कलाकार चित्रपट सोडून जाण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणाला रणवीर सिंह?

या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना रणवीरने एक निवेदन जारी केलं आहे. यात त्याने म्हटलंय की सार्वजनिक प्रतिक्रिया देणं किंवा कोणत्याही अंदाजांना खतपाणी घालणं त्याला कधीही आवश्यक वाटलं नाही. तो सध्या त्याच्या कामावर आणि भविष्यातील वचनबद्धतेवर लक्ष केंद्रीत करत आहे. ‘डॉन 3’ हा लोकप्रिय फ्रँचाइजीमधील तिसरा भाग असणार होता. या चित्रपटाचं शूटिंग अद्याप सुरूही झालं नव्हतं. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, आतापर्यंत प्री-प्रॉडक्शनवर 45 कोट रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. युनिट शूटिंगसाठी निघण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी रणवीरने चित्रपट सोडला होता.

खर्चाविषयी अशोक पंडित म्हणाले, “निर्माते आणि दिग्दर्शकांनी निर्मितीपूर्वचा सर्व खर्च आणि लेखापरीक्षणही सांगितलं. यामध्ये 200 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल्स, शूटिंगचे लोकेशन्स आणि परदेश प्रवासाच्या बुकिंगचा समावेश आहे. सर्व गोष्टी कागदोपत्री नोंदवलेल्या आहेत. यातलं काहीच ऐकीव नाही.” फेडरेशनचं म्हणणं आहे की त्यांनी रणवीर सिंहला त्याची बाजू मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु दर दहा दिवसांनी तीन वेळा आठवण करून देऊनही त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

या संपूर्ण प्रकरणी फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी म्हणाले, “आम्हाला इंडस्ट्रीला हा संदेश द्यायचा आहे की कोणताही सुपरस्टार हा कायद्यापेक्षा मोठा नाही. जोपर्यंत तो स्वत: आम्हाला भेटायचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही असहकाराचा आदेश कायम ठेवू.” तर दुसरीकडे रणवीरने जारी केलेल्या निवेदनात त्याने म्हटलंय की, त्याला डॉन या चित्रपटाच्या फ्रँचाइझीशी संबंधित प्रत्येकाबद्दल खूप आदर आहे. पण त्याचा असाही विश्वास आहे की व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे प्रतिष्ठा, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने हाताळले पाहिजेत.

Follow Us