पूजा भट्टवर हात उचलल्याच्या वादावर अखेर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला ‘आता तरी सत्य..’
या जुन्या वादाबाबत सार्वजनिक पातळीवर अनेक वर्षे वेगवेगळे दावे होत राहिले. त्यामुळे राहुल भट्टची अलीकडील कबुली आणि त्यानंतर रणवीर शौरीची प्रतिक्रिया यामुळे या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळालं आहे.

अभिनेता रणवीर शौरी आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका पूजा भट्ट यांच्या दोन दशकांपूर्वीच्या नात्याशी संबंधित वाद पुन्हा चर्चेत आला आहे. पूजाचा भाऊ राहुल भट्ट याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 2002 मध्ये रणवीर शौरीसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेबद्दल भाष्य केलं. त्यावेळी मी प्रमाणापेक्षा जास्त भडकलो होतो आणि कायदा हातात घेणं चुकीचं होतं, अशी कबुली राहुलने दिली. या वक्तव्यानंतर आता रणवीरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत गेल्या 20 वर्षांपासून त्याच्याविषयी करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केलं.
आरजे सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये राहुल भट्टने 2002 मधील घटनेची आठवण सांगितली. पूजा भट्ट आणि रणवीर शौरी यांच्यात वाद झाला होता. या वादात रणवीरने पूजावर हात उचलल्याचा दावा राहुलने केला. त्यानंतर दोघांच्या भांडणात त्याने हस्तक्षेप केला. मात्र त्यावेळची माझी प्रतिक्रिया अतिशय तीव्र होती, असं राहुलने मान्य केलं. राहुलने सांगितलं की त्याने रणवीरच्या गाडीची काच फोडली होती आणि त्याच्या एका बरगडीला दुखापत झाली होती. या प्रकरणात राहुलला अटक झाली आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. अनेक वर्षांनंतर या घटनेकडे पाहताना आपली कृती चुकीची होती आणि त्याचा आपल्याला पश्चात्ताप असल्याचं राहुलने सांगितलं.
रणवीर शौरीची पोस्ट
राहुल भट्टच्या या कबुलीनंतर रणवीर शौरीने आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या ‘प्रचार आणि बदनामीला’ आता काही प्रमाणात सत्याची जागा मिळाली, असं त्याने उपरोधिकपणे म्हटलंय. यासोबतच रणवीरने एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला. हिंसाचारापासून स्वतःचा बचाव करून एखाद्या विषारी परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला मारहाण करणं नव्हे, अशी बाजून त्याने स्वत:ची मांडली आहे. त्याच्या या पोस्टमुळे जुन्या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे पुन्हा चर्चेत आले आहेत.
I’m glad over 20 years of malicious propaganda and slander has finally given way to some truth!
Let me add the missing piece, so it can finally rest now: defending yourself against violence to escape someone toxic is not “hitting”! https://t.co/6ZmWnDVx8K— Ranvir Shorey (@RanvirShorey) September 30, 2026
वादानंतर काय झालं?
रणवीर शौरी आणि पूजा भट्ट यांचं नातं 2000च्या दशकाच्या सुरुवातीला चर्चेत होतं. दोघांनी ‘जिस्म’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा झाली. मात्र अवघ्या दोन वर्षांत त्यांचं ब्रेकअप झालं. 2002 मध्ये त्यांचं नातं संपुष्टात आलं आणि त्यानंतर या वादाने मोठं स्वरूप घेतलं. रणवीरने नंतर कायदेशीर प्रकरण मिटवण्यासाठी समजूतदारपणा दाखवला, असं राहुलने म्हटलंय. त्याने आर्थिक भरपाईची मागणी न करता प्रकरण संपवण्यास सहमती दर्शवली, असंही राहुलने सांगितलं. रणवीरच्या या भूमिकेबद्दल त्याने आता आदरही व्यक्त केला आहे.