Rati Agnihotri : प्रेमविवाहानंतर आयुष्यात वादळ! तब्बल ३० वर्षे सहन केला पतीचा छळ अन्…सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वेदनादायी कहाणी
Bollywood Actress : बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात 30 वर्षे खूप छळ सहन केला. अभिनेत्रीचा पती तिला मारहाण करायचा.

८० च्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं त्या अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. मात्र, पडद्यावर नेहमी हसतमुख दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग घडले. प्रेमविवाह केल्यानंतर त्यांना वैवाहिक आयुष्यात मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला होता. तब्बल ३० वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
वयाच्या दहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण
रती अग्निहोत्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. १९७९ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या यशानंतर त्यांना हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांच्या अनेक ऑफर्स मिळू लागल्या.
करिअरच्या शिखरावर असताना केला प्रेमविवाह
चित्रपटसृष्टीत यश मिळत असतानाच रती अग्निहोत्री यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये त्यांनी उद्योगपती आणि वास्तुविशारद अनिल विरवानी यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, त्यांनी आपल्या प्रेमाला प्राधान्य देत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून काही काळ विश्रांती घेतली आणि संसाराकडे लक्ष दिलं. मात्र, वैवाहिक आयुष्यात पुढे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लग्नाच्या सुरुवातीच्या काळातच पतीकडून मारहाण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालांतरानं हा त्रास वाढत गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
View this post on Instagram
मुलाच्या जन्मानंतरही परिस्थितीत झाला नाही बदल
१९८६ मध्ये रती अग्निहोत्री आणि अनिल विरवानी यांना मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती सुधारेल, अशी रती यांना आशा होती. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतरही त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक वर्षे वैवाहिक नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
एका मुलाखतीत त्यांनी मुलासाठी हे नातं टिकवून ठेवल्याचं सांगितलं होतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा परिणाम मुलावर होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी बराच काळ या परिस्थितीबद्दल सार्वजनिकरीत्या बोलणं टाळलं.
२०१५ मध्ये पतीविरोधात दाखल केली पोलिसांत तक्रार
अनेक वर्षे त्रास सहन केल्यानंतर अखेर २०१५ मध्ये रती अग्निहोत्री यांनी पतीविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. पतीकडून मारहाण, मानसिक छळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या. रती यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती असह्य झाल्यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा तनुज चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर होता. त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचं ठरवलं.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, या संपूर्ण घटनेचा रती यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला. या घटनेनंतर रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती दोन महिने वेगळे राहिले. पण, २०१५ मध्ये दोघेही त्यांचा मुलगा तनुजसाठी एकत्र आले. दरम्यान, रतीचा पती अनिल म्हणाला की, आता त्यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत.
