बिग बॉस फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल, पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

पाच लाखांच्या खंडणीसाठी माजी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण; ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल.

बिग बॉस फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल, पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 8:50 PM

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याचे सांगून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे हिच्यासह तिच्या साथीदारांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (65) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार ही कारवाई केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य असून, संस्थेच्या वतीने 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.

माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी

या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला संस्थेकडून कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते किंवा कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही देण्यात आली नव्हती, असा डॉ. गायकवाड यांचा आरोप आहे. मात्र, कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचे सांगून ऑगस्ट महिन्यापासून दिव्या शिंदे हिने फोन आणि संदेशांद्वारे त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली.

17 सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण डॉ. गायकवाड यांच्या घरी गेले. त्यावेळी गायकवाड घरी नसल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर 23 सप्टेंबरला ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावले. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जिवे मारण्याची धमकी

यानंतर 24 सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तेथे आला. त्यांनी दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसले. आरोपींनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us