‘राजा शिवाजी’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा; रितेश देशमुखचं 10 वर्षांचं स्वप्न

अभिनेता रितेश देशमुख दहा वर्षांपासून जे स्वप्न पाहिलं, ते अखेर सत्यात उतरलं आहे. 'राजा शिवाजी' हा त्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

राजा शिवाजीचा टीझर पाहून अंगावर येईल काटा; रितेश देशमुखचं 10 वर्षांचं स्वप्न
Raja Shivaji टीझर
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 12:20 PM

अभिनेता रितेश देशमुखच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरित्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित झाला आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.

‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा, दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे,’ असं लिहित रितेशने हा टीझर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख , आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे. तर सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभं करणारं संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us