तुम्ही रितेशला असं म्हणू शकता का? ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीचा थेट सवाल
'गाढवाचं लग्न' या चित्रपटात गंगीची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजश्री लांडगे आठवतेय का तुम्हाला? राजश्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली असून त्यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट तुफान गाजला होता. आजही प्रेक्षकांना हा चित्रपट तितकाच आवडतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची तर अभिनेत्री राजश्री लांडगेनं त्यांची पत्नी म्हणजेच गंगीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना प्रचंड भावलेली ही गंगी मात्र नंतर चित्रपटांपासून दूर गेली. चित्रपटसृष्टीतल्या ग्रुपने मला कायम बाजूला ढकललं, अशी खंत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली. यावेळी तिने अभिनेता रितेश देशमुखचं उदाहरण देऊन तिचं मत मांडलं.
“इंडस्ट्रीने मला कायम बाजूला ढकललं”
“चित्रपटसृष्टीतल्या काही ग्रुपने मला कायम बाजूला ढकललं आहे. अरे तुम्ही काय, तुमचा समाज राजकीय क्षेत्रात असतो, तुमच्याकडे जमीन असते, शेती असते.. मग इथे तरी आम्हाला काम करू द्या. त्यावर माझं एकच उत्तर आहे की तुम्ही रितेश देशमुखला असं म्हणू शकता का? माझ्याच समाजाचा आहे. त्याचे वडील मुख्यमंत्री होते. रितेशपेक्षा मोठं कोण आहे या क्षेत्रात? आम्हाला त्याचं प्रचंड भूषण आहे. कशाला लाज वाटली पाहिजे? तुम्ही त्यांना सांगू शकत का, तुमच्याकडे सगळंच आहे. तुम्ही कशाला चित्रपटसृष्टीत काम करता?,” असं ती म्हणाली.
“त्यांचं बॅकग्राऊंड कितीही मोठं असो, कुठेतरी त्यांचं स्वत:चं वागणं, त्यांच्या कामाची पद्धत.. यामुळेच ते लोकप्रिय आहेत ना? केवळ माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, म्हणून तो बॉलिवूडमध्ये इतका प्रसिद्ध आहे का? ठीक आहे, बाकीच्यांपेक्षा त्यांना उपलब्धी सोपी गेली असेल. परंतु शेवटी त्यांच्या वागण्यामुळे, कामामुळे ते लोकप्रिय आहेत. ही गोष्ट तुम्ही त्यांच्यापासून काढून घेऊ शकत नाही,” असं राजश्रीने स्पष्ट केलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “तसंच राजश्री लांडगेचं आहे. जर माझी गंगी भावली नसती, केवळ हिचं बॅकग्राऊंड काहीतरी आहे म्हणून मी गाजू शकते का? ज्याचा-त्याचा स्ट्रगल आहे. तुम्ही कामावर बोला. स्पर्धा करायची असेल तर बाकीचं सगळं सोडा आणि फक्त कामावर बोला. कारण राजश्री लांडगे ही कोणाची मुलगी आहे, हे कॅमेऱ्याला माहीत नाही. कॅमेऱ्याला रितेश देशमुखचं बॅकग्राऊंड कळत नाही. कॅमेऱ्याला फक्त ती व्यक्ती दिसते, तो अभिनय दिसतो.”
