Nana Patekar : त्यांनी आयुष्यभर…तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांच्या जवळच्या व्यक्तीनं सोडलं मौन
Nana Patekar And Tanushree Dutta Controversy : तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता नाना पाटेकर यांच्या जवळच्या व्यक्तीनं मौन सोडलं आहे.

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एकीकडे नाना पाटेकर यांच्या निधनावर कलाकारांनी शोक व्यक्त केला. तर दुसरीकडे, अभिनेत्री तनुश्री दत्ता नाना पाटेकर यांच्याबद्दल नको ते बरळली. अभिनेत्रीनं जुनं प्रकरण पुन्हा उकरून काढलं आणि नाना पाटेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 2008 मध्ये तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलेला. त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला. आता पुन्हा एकदा या वादासंदर्भात तनुश्रीनं वक्तव्य केलं. यावर आता नाना पाटेकर यांच्या जवळच्या व्यक्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन पाटेकरची पोस्ट
नाना पाटेकर यांचा पुतण्या सचिन पाटेकरनं तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मौन सोडलं आहे. सचिननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘एक नम्र आवाहन…माझे काका, ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि चुकीच्या बातम्या अत्यंत दुःखद आहेत. ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्यांचा आदरणीय न्यायालयाने निकाल दिला आहे.’
‘कृपया कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे शेअर करू नका. त्यांनी आयुष्यभर आपल्या अभिनयातून आणि समाजसेवेतून माणुसकीचा आदर्श जपला. त्यांच्या स्मृतीचा आणि कर्तृत्वाचा आदर राखूया.’ असं सचिन शेवटी म्हणाला आहे.
View this post on Instagram
सचिन आणि नाना पाटेकर यांच्यात जवळचं नातं होतं. सचिन, नाना पाटेकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा.
दरम्यान, तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हारनंही भाष्य केलं. ‘हिंदुस्तान टाइम्स‘ला दिलेल्या मुलाखतीत मल्हार म्हणाला की, ‘कोणाचंही नाव न घेता मला एवढंच सांगायचं आहे की, लोक ज्या प्रकरणाचा विनाकारण उल्लेख करत आहेत, ते प्रकरण आधीच संपलं आहे. न्यायालयाकडून त्याबाबत स्पष्टता मिळाली आहे. तरीही लोक त्याबद्दल बोलत आहेत. अशा लोकांना मी काहीही बोलणार नाही. सत्य तेच राहील. देव त्यांचं भलं करो, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे.’
