Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांनी मनसेत प्रवेश केला होता का? चर्चांवर अखेर स्पष्टच बोलले..
Sachin Pilgaonkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत किंवा राजकारण प्रवेश केल्याच्या चर्चांवर अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते राजकारणातील प्रवेशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.

Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर हे नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या सचिन यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण मनसेत प्रवेश केला नव्हता, तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सदस्य म्हणून काम करत होतो, असं त्यांनी सांगितलं.
सचिन पिळगांवकर यांनी मुलाखतीत राजकारणातील प्रवेशाबाबत बोलताना चित्रपट संघटनांमधील आपल्या सहभागाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “मी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्य होतो, अभिनेता म्हणून. जशी शिवसेनेची आहे, तशीच मनसेची ही एक असोसिएशन आहे. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि संगीतकारांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराचे पैसे बुडाले असतील किंवा त्याच्यावर अन्याय झाला असेल, तर अशा प्रकरणांमध्ये संबंधित संघटना मदतीसाठी पुढे येतात. या उद्देशानेच आपण चित्रपट सेनेचे सदस्य झालो होतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटनांचं महत्त्व सांगताना सचिन पिळगांवकर यांनी चित्रपट महामंडळाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आपण चित्रपट महामंडळाचे सदस्य आहोत, शिवसेना चित्रपट सेनेचेही सदस्य आहोत आणि मनसे चित्रपट सेनेचेही सदस्य आहोत. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एखादी संस्था काम करत असेल, तर त्या संस्थेशी जोडून घेण्यास आपली हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. “कोणत्या पक्षाने ते केलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी कोणीतरी उभं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांवर बोलताना सचिन पिळगांवकर यांनी आपल्या अभिनयावरील प्रेमही व्यक्त केलं. “माझा राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्या प्रेक्षकांनी मला एक उपाधी दिली आहे… अभिनेता. यातले पहिले दोन शब्द वगळून जगण्यास मला स्वारस्य नाही. मला जी गोष्ट येत नाही, ती मी करायला जात नाही,” असं ते म्हणाले.