Salman Khan: असं करायला नको होतं, मी माफी मागतो..; तब्येतीबद्दल चिंता व्यक्त होताच सलमान खानची प्रामाणिक कबुली
Salman Khan: शोच्या एका प्रोमोमुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण झाली होती. त्यावर आता सलमानने माफी मागत स्पष्टीकरण दिलं आहे. चॅनलच्या वतीने त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.

Salman Khan: ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’चा एक प्रोमो समोर आल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रोमोमध्ये सलमान अचानक छातीत हात धरताना, त्रास होत असल्याचं सांगताना आणि डॉक्टरांना बोलवण्यास सांगताना दिसला. त्यानंतर तो स्टेजवर खाली झोपल्याचंही पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सलमानच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, आता स्वतः सलमान खानने या संपूर्ण प्रकारामागचं सत्य स्पष्ट केलं आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली. ‘देवाच्या कृपेने माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाही’, असं सांगत त्याने चाहत्यांना दिलासा दिला. त्यामुळे प्रोमो पाहून निर्माण झालेल्या आरोग्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
खरं तर हा संपूर्ण प्रकार ‘बिग बॉस 20’मधील स्पर्धक काजी तौकीरशी संबंधित होता. काजीने यापूर्वी घरात तब्येतीशी संबंधित एक प्रसंग निर्माण केला होता. त्यावेळी इतर स्पर्धकांना त्याची प्रकृती खरोखरच बिघडल्याचं वाटलं होतं. मात्र, नंतर काजीने आपण अभिनय करत असल्याचं स्पष्ट केलं. त्याच्या या वागण्यावर सलमानने नाराजी व्यक्त केली होती. स्वतः छातीत दुखत असल्याचा अभिनय काजीला एक मुद्दा समजावून सांगण्यासाठी केला होता, असं सलमानने स्पष्ट केलं. एखाद्याच्या आरोग्याशी संबंधित गोष्ट मनोरंजनासाठी वापरल्यास त्याचा इतरांवर किती परिणाम होऊ शकतो, हे काजीला दाखवण्यामागे त्याचा उद्देश होता. विशेष म्हणजे घरातील इतर सदस्यांना काजी अभिनय करत असल्याची माहिती नव्हती आणि त्यामुळे ते खरोखरच चिंतेत पडले होते, असं सलमानने स्पष्ट केलं.
मात्र, हा संदेश प्रोमोच्या एडिटिंगमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही, असं सलमानने म्हटलं. प्रोमो अशा पद्धतीने कट करण्यात आला की, तो स्वतःही काजीसारखाच तब्येतीचा अभिनय करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे संपूर्ण प्रसंगाचा मूळ संदर्भ बाजूला राहिला आणि चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत काळजी वाटली. याच कारणामुळे सलमानने प्रोमोच्या एडिटिंगबद्दल माफीही मागितली. शोच्या प्रमोशनसाठी अशा पद्धतीने प्रोमो तयार करण्याची पद्धत असू शकते, असं म्हणत त्याने चॅनेलच्या वतीने चाहत्यांची माफी मागितली. त्यानंतर निर्मात्यांनी काजी तौकीरच्या वागण्यावर सलमान त्याच्याशी चर्चा करत असल्याचा आणखी एक प्रोमोही शेअर केला.
सलमानची पोस्ट-
‘देवाच्या कृपेने माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. ‘बिग बॉस’चा प्रोमो ज्या पद्धतीने एडिट करण्यात आला, तसा तो कट करायला नको होता. त्यामुळे संपूर्ण मुद्दाच बदलून जातो आणि असं वाटतं की, घरात काजीने जे केलं होतं, तेच मी करत आहे. माझ्या छातीत दुखत असल्याचं दाखवण्यामागचा उद्देश केवळ काजीला त्याने केलेली चूक समजावून सांगणं हा होता. कारण त्याने आपल्या तब्येतीचा वापर मनोरंजनासाठी केला होता. विशेषतः घरातील 15 सदस्यांना तो अभिनय करत असल्याची माहिती नव्हती आणि त्यामुळे ते त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत होते. प्रोमो ज्या पद्धतीने एडिट करण्यात आला त्याबद्दल माफ करा. शोच्या प्रमोशनसाठी अशाच पद्धतीने प्रोमो तयार करण्याचा फॉरमॅट असावा, असं मला वाटतं. त्यांच्यावतीने मी माफी मागतो,’ काही मिनिटांनंतर सलमानने शोच्या निर्मात्यांचे आभार मानत लिहिलं, ‘बिग बॉसने प्रोमोमध्ये सुधारणा केली आहे. धन्यवाद बिग बॉस.’