Pandit Shivkumar Sharma: ‘संतूर सम्राट’ पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

| Updated on: May 10, 2022 | 1:06 PM

ते 84 वर्षांचे होते. 'पद्मभूषण' पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म 1938 मध्ये जम्मूमध्ये झाला. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार मानले जातात.

Pandit Shivkumar Sharma: संतूर सम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
Pandit Shivkumar Sharma
Image Credit source: Twitter
Follow us on

संतूर सम्राट म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचं मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. कार्डिॲक अरेस्टने (cardiac arrest) त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे. ‘पद्मभूषण’ पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म 1938 मध्ये जम्मूमध्ये झाला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या वडिलांकडूनच गायनाचे धडे गिरवले. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर पोहोचवण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. संतूर हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकवाद्य आहे. संतूर या वाद्याला त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.

बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव- हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने मिळून अनेक चित्रपटांतील गाण्यांना संगीतबद्ध केलं. यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ (1980) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (1985), ‘चांदनी’ (1989), ‘लम्हे’ (1991), ‘डर’ (1993) या चित्रपटांना संगीत दिलं. पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीत आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे. लेखिका इना पुरी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला.

सोशल मीडियावर शोक व्यक्त

हे सुद्धा वाचा

भारतीय संस्कृती आणि परंपरा याला त्यांनी कायम महत्त्व दिलं. “आपण केवढा मोठा वारसा आणि परंपरा घेऊन जन्माला आलो आहोत याची मुलांना जाण नाही. त्यांच्यामध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागवायचा असेल तर त्याचे धडे शालेय जीवनापासूनच द्यायला हवेत”, असं मत त्यांनी एका कार्यक्रमात मांडलं होतं. “सध्याच्या शिक्षण पद्धतीतील विषय मुलांवर ओझं लादतात. त्यातून बाहेर पडून संगीत हा मन एकाग्र करणारा आणि ताजंतवानं करणार विषय आहे. त्यामुळे मुलांची क्षमता वाढू शकेल. आपल्या कलाकाराला परदेशात पुरस्कार मिळाल्यानंतर तो चांगला असल्याची जाण लोकांना येते. मात्र परदेशी कलाकारांना भारतामध्ये पुरस्कार मिळणं गौरवाचं व्हावं आणि त्यांनी ते डोक्यावर घ्यावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे”, असंदेखील ते म्हणाले होते.