त्यांच्या कानाखाली मारायची वेळ आलीये..; सयाजी शिंदे स्पष्टच बोलले, जेन-झींबद्दल काय म्हणाले?
Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेन-झींबद्दलचं स्पष्ट मत मांडलं आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

देशभरात तरुणाईच्या प्रश्नांवर आणि विविध मुद्द्यांवर जेन-झींकडून आवाज उठवला जात असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी या पिढीच्या भूमिकेबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी जेन-झी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. सयाजी शिंदे यांनी आपल्या भूमिकेत ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदर राखण्याचं महत्त्व मान्य केलं. मात्र, केवळ वय मोठं आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “आता मोठ्या माणसांना इज्जत द्या, आदर द्या, त्यांचं अनुकरण करा.. पण ते जर त्या लायकीचे नसतील तर त्यांच्या कानाखाली मारायची वेळ आता आली आहे किंवा त्यांनी तशी वेळ आणली आहे,” असं सयाजी शिंदे म्हणाले.
‘आम्ही सर्व जेन-झींच्या बाजूने’
जेन-झींच्या आंदोलनाबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी तरुणांच्या भूमिकेला महत्त्व दिलं. “या मुलांच्या बाजूने आपण उभं राहू. आम्ही सर्व जेन-झींच्या बाजूने आहोत,” असं त्यांनी म्हटलं. तरुण पिढी अनेक मुद्द्यांवर अभ्यास करून बोलत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
गेल्या काही महिन्यांत जेन-झींच्या आंदोलनांमुळे तरुणांचा सार्वजनिक आणि सामाजिक प्रश्नांमधील सहभाग चर्चेत आला आहे. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी आंदोलनांपर्यंत तरुणांनी आपले प्रश्न मांडले आहेत. जुलै 2026 मध्ये दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही मोठी चर्चा झाली होती.
सयाजी शिंदे यांनी जुन्या पिढी आणि नव्या पिढीमधील विचारांच्या फरकाकडेही लक्ष वेधलं. त्यांच्या मते, तरुण अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न उपस्थित करत असताना मोठी मंडळी मात्र स्वतःचा खोटेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. “कारण ते अभ्यासपूर्ण बोलत आहेत आणि आपला खोटेपणा लपवण्यासाठी आपण धडपडतोय. हे आताचं दुर्दैव आहे,” असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी केवळ जेन-झींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, तर ज्येष्ठ पिढीनेही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सूचित केलं आहे.
सयाजी शिंदे यापूर्वीही सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडताना दिसले आहेत. वृक्षतोडीविरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला असून ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काम केलं आहे.