Shivaji Satam : माझ्या पत्नीला कॅन्सर झालेला…शिवाजी साटम यांनी सांगितला कठीण काळ, नाना पाटेकरांनी दिलेली साथ
Shivaji Satam On Nana Patekar : शिवाजी साटम यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. शिवाजी यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला, त्यावेळी नाना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.

चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे नाना पाटेकर, खऱ्या आयुष्यात आपल्या मित्रांसाठी ढालच होते. अशातच आता शिवाजी साटम यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. नाना पाटेकर यांच्या स्मरणार्थ, ‘आठवणीतले नाना’ ही शोकसभा आयोजित करण्यात आलेली. चित्रपटसृष्टीतील अनेक लोक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आले होते. शिवाजी यांनी सांगितलं की, नानांच्या आग्रहामुळेच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘यशवंत’ होता, ज्यात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सुरुवातीला, शिवाजी ती भूमिका करण्यास तयार नव्हते, पण नानांनी त्यांची समजूत घातली आणि अखेरीस ते तयार झाले.
शिवाजी साटम यांनी सांगितली आठवण
शिवाजी यांना ‘यशवंत‘ सिनेमासाठी मिळालेल्या मानधनाबद्दल ऐकून नाना पाटेकर यांना धक्का बसला. नानांनी लगेच निर्मात्याला फोन केला. शिवाजी यांनी सांगितलं की, नानांनी त्या निर्मात्याला बोलावून जवळपास दोन तास उभं केले. तो बिचारा निर्माता एकही शब्द न बोलता तिथे उभा राहिला.
नाना पाटेकर आणि शिवाजी साटम यांची मैत्री केवळ चित्रपट आणि पैशांपुरती मर्यादित नव्हती. शिवाजींनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाची आठवण सांगितली, जेव्हा ते ‘गुलाम-ए-मुस्तफा’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. एवढ्या मोठ्या कौटुंबिक संकटामुळे शिवाजी यांना शूटिंग सुरू ठेवणं कठीण झालं. त्यांनी चित्रपट सोडण्याचाही विचार केला होता. पण नानांनी त्यांना सिनेमा सोडू दिला नाही.
शिवाजी यांनी सांगितलं की, नानांनी चित्रपटाचे दिग्दर्शक पार्थो घोष आणि इतरांशी बोलून शूटिंगची अशी वेळ ठरवली, ज्यामुळे त्यांना कामानंतर घरी परत येऊन आपल्या पत्नीसोबत राहता येईल. त्यांना दुपारी १२ वाजता बोलावून रात्री ८ वाजेपर्यंत निघण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाजी यांनी भावूक होत सांगितलं की, नानांनी त्यांच्यासाठी इतकं काही केलं, जे त्यांचा स्वतःचा भाऊसुद्धा करू शकला नसता. शिवाजी म्हणाले की, नानांची मैत्री टिकवण्याची एक अनोखी पद्धत होती. ते अचानक फोन करून त्यांची विचारपूस करायचे आणि मग त्यांना आपल्या शेतावर बोलावून घ्यायचे.
दरम्यान, नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.
