Divya Bharti : दुबईला बोलावतात आणि एक रात्र…दिव्या भारतीनं अभिनेत्रीसमोर अंडरवर्ल्डबद्दल केलेला खुलासा
Actress On Divya Bharti And Underworld : प्रसिद्ध अभिनेत्रीला दिव्या भारतीनं अंडरवर्ल्डबद्दल माहिती दिलेली. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

अभिनेत्री सोमी अली ९० च्या दशकातील एक बॉलिवूड अभिनेत्री असून तिनं अनेक चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच एका मुलाखतीत सोमीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि बॉलिवूडमधील तिच्या काळातील अनेक किस्से सांगितले. बॉलिवूडचं जग बाहेरून जितकं ग्लॅमरस दिसत असेल, त्यामागील सत्य तितकीच मनोरंजक आणि कधीकधी आश्चर्यकारकही असतात, असं सोमी म्हणाली. तसेच अभिनेत्रीनं दिव्या भारती आणि अंडरवर्ल्डबद्दलही भाष्य केलं आहे.
‘बॉलिवूड लाईफ’शी बोलताना सोमी अलीनं सांगितलं की, ती वयाच्या १६ व्या वर्षी भारतात आली. ती अभिनेता सलमान खानच्या प्रेमात पडली आणि तिला लग्न करायचं होतं. लग्नाचं स्वप्न घेऊन ती मुंबईत आली. सोमी विमानात होती आणि तिथं तिची सलमान खानशी भेट झाली. त्यावेळी ते दोघे खूप दूर होते. सोमी म्हणाली की, तो जवळ आला आणि त्यानं विचारलं की ती ठीक आहे का, आणि मी म्हणाले, ‘हो, सर्व काही ठीक आहे. मी तुझ्याशी लग्न करायला आले आहे, आणि मी तुझा फोटो माझ्या खिशात ठेवला आहे जेणेकरून मी तुला ओळखू शकेन.’
दिव्या भारतीने सोमी अलीला काय सांगितलं?
सोमीनं याच मुलाखतीत खुलासा केला की, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नवीन होती, तेव्हा तिला इंडस्ट्रीच्या अनेक पैलूंबद्दल काहीच कल्पना नव्हती. ती लहान वयात भारतात आली होती आणि चित्रपटसृष्टी तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. ‘त्यावेळी, मी पूर्णपणे नवीन होते.’ असं सोमी म्हणाली. सोमीनं सांगितलं की, तिनं १९९० ते १९९९ पर्यंत बॉलिवूडमध्ये काम केलं आणि त्या काळात तिची दिव्या भारतीशी मैत्री झाली. दिव्यानं तिला अंडरवर्ल्ड काय आहे आणि चित्रपटसृष्टीत हा शब्द कसा वापरला जातो हे समजावून सांगितलं.
सोमी म्हणाली की, ‘दिव्या आणि माझी चांगली मैत्री झालेली. त्यावेळी मला अंडरवर्ल्डबद्दल माहित नव्हतं. ते माफिया आहेत, असं दिव्या म्हणलेली. ते लोक निर्मात्यांवर अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सिनेमात घेण्यासाठी दबाव टाकतात. त्यानंतर मग ते अभिनेत्रींना दुबईला बोलावतात आणि त्यांना एक रात्र जबरदस्ती त्यांना तिथे ठेवतात, हे सगळं मला दिव्याने सांगितलं. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.’
