Sonali Bendre : मी त्याची फॅन…मायकल जॅक्सनच्या स्वागताला गेलेली सोनाली बेंद्रे, अभिनेत्रीनं सांगितला 1996 चा किस्सा
Sonali Bendre : सोनाली बेंद्रे 1996 मध्ये मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर गेलेली. एका कार्यक्रमात अभिनेत्रीनं यादरम्यानचा किस्सा सांगितला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे 30 ऑक्टोबर 1996 रोजी मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सोनाली बेंद्रेनं नऊवारी साडी नेसलेली. अभिनेत्रीचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. अशातच आता एका कार्यक्रमात सोनाली बेंद्रेनं याबद्दल भाष्य केलं असून त्यामागची खरी गोष्ट सांगितली आहे.
सोनाली बेंद्रेनं माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती‘ मध्ये हजेरी लावलेली. यादरम्यान सोनालीनं मायकल जॅक्सनच्या स्वागताचा किस्सा सांगितला आहे. सोनी मराठीनं ‘कोण होणार करोडपती‘चा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये माधुरी म्हणतेय की, ‘मायकल जॅक्सन इतका श्रेष्ठ नर्तक मी त्याची चाहती आहे. तो जेव्हा मुंबईला आलेला तेव्हा तू नऊवारी साडी नेसून टिळा लावून त्याचं स्वागत केलं तो अनुभव कसा होता?’
सोनाली बेंद्रेनं सांगितला किस्सा
यावर सोनाली म्हणाली की, ‘खरं तर मी त्याची फॅन नव्हते. मला त्यांनी म्हटलं होतं की, आम्हाला मराठी मुलगी हवी आहे. त्यावेळेला मला माझ्या कुटुंबासाठी आणि मैत्रिणींसाठी तिकिटे मिळाली आणि नऊवारीबद्दल मला फार उत्सुकता होती. माझी आजी नेसायची. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. पण त्यानंतर जेव्हा मी कॉन्सर्टला गेले ना तेव्हा मला समजलं की, तो किती श्रेष्ठ कलाकार आहे. खूप कमाल आहे तो. खूप कमाल गातो त्यानंतर मी त्याची फॅन झाले.’
View this post on Instagram
यापूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणालेली की, ‘राज ठाकरेंच्या पत्नीने मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, तुला यावंच लागेल आणि हे करावंच लागेल. शर्मिलांची आई आणि माझी मावशी बऱ्याच काळापासून मैत्रिणी आहेत आणि त्या म्हणाल्या, ‘तू मायकल जॅक्सनचं स्वागत का करत नाहीस?’ मी म्हणाली, ठीक आहे, पण मग शोसाठीची तिकिटेहवी आहेत अशी अट घातली. म्हणून मी मायकल जॅक्सन यांचं स्वागत केलं, कारण मला ही तिकिटं हवी होती. माझी बहीण, बहिणीच्या मैत्रिणी आणि सगळे गेलो होतो. आमच्याकडे बसण्याची व्यवस्था खूप छान होती.’
