विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लिहिली अशी पोस्ट; अभिनेत्रीने थेट गमावले 3 लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स
विद्यार्थी आंदोलनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर या अभिनेत्रीला तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या पोस्टवरील कमेंट सेक्शन तिने थेट बंद केलं आहे. मात्र तिचे फॉलोअर्स अजूनही कमी होत आहेत.

सध्या संपूर्ण देशभरात आणि सोशल मीडियावर एकाच गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे, ती म्हणजे ‘विद्यार्थ्यांचं आंदोलन’. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन पाहता पाहता देशव्यापी बनलं आणि असंख्य तरुण, जेन-झी त्यात सहभागी झाले. अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण आंदोलनात सोशल मीडियानेही मोठी भूमिका बजावली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर सोशल मीडियावर पोस्ट लिहिलेल्या एका अभिनेत्रीला मात्र त्याचा मोठा फटका बसला आहे. या अभिनेत्रीला तिच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर त्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या लाखोंनी कमी झाली आहे.
मल्याळम सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्री, टेलिव्हिजन होस्ट आणि आता युट्यूबर बनलेल्या पर्ल मॅनीने 24 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एक भलीमोठी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने आंदोलनाबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. पर्लने लिहिलं होतं, ‘या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा होता. त्यांच्या मागण्याही पूर्णपणे योग्य होत्या. मी सर्व विद्यार्थ्यांना आंदोलन सोडून घरी परतण्याचं आवाहन करते, कारण स्वत:ला इजा करून घेण्यात काहीच फायदा नाही. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यापेक्षा मोठं कोणतंही कारण नाही.’
काय होती अभिनेत्रीची पोस्ट?
पर्लच्या या पोस्टनंतर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी तिच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली होती. तिला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागचं गांभीर्यच समजलं नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. या टीकेनंतर पर्लने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कमेंट सेक्शन हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतिबिंब आहे.’ या एका पोस्टमुळे पर्लने जवळपास 3 लाख फॉलोअर्स गमावले आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, या वादग्रस्त पोस्टच्या आधी पर्लचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स 5.7 दशलक्ष होते, ते आता थेट 5.3 दशलक्षांपर्यंत घसरले आहेत. पर्लने फेसबुक आणि युट्यूबवरही मोठ्या संख्येने फॉलोअर्स गमावले आहेत.
पर्लने ‘ल्युडो’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. अनुराग बासू दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांच्या भूमिका होत्या.