Govinda: त्याला रोमान्स मी शिकवला अन् आता तो..; गोविंदाबद्दल सुनीता स्पष्टच बोलली..
Govinda- Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आता त्याची पत्नी सुनीता अहुजाची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ती गोविंदाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

Govinda- Sunita Ahuja: बॉलिवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता गोविंदा आजही आपल्या अभिनय, डान्स आणि कॉमेडीच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अशातच त्याची पत्नी सुनीता अहुजाने गोविंदाच्या करिअरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. गोविंदा आजही नव्वदच्या दशकातील चित्रपटांच्या धाटणीचा सिनेमा बनवण्याचा विचार करतो, मात्र ‘आज तो चित्रपट कोण पाहणार?’, असा थेट सवाल सुनीताने केला आहे. सुनीताने गोविंदाच्या सध्याच्या करिअरमधील अडचणींबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तिच्या मते, गोविंदाच्या आजूबाजूला असलेली मंडळी त्याला योग्य सल्ला देत नाहीत. ते त्याच्या प्रत्येक निर्णयाचं कौतुक करतात, मात्र आवश्यक तेव्हा वास्तव परिस्थिती सांगत नाहीत, असं सुनीताचं म्हणणं आहे.
सुनीताने गोविंदाला स्वतः सत्य सांगत असल्याचंही म्हटलंय. मात्र तिचं स्पष्ट बोलणं त्याला नेहमी आवडत नाही, असं तिने सांगितलं. तिच्या मते, गोविंदाने बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये आणि आपल्या चित्रपटाच्या निवडीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. गोविंदाच्या लोकप्रियतेचा मोठा काळ 1990च्या दशकात होता. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘हीरो नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियां छोटे मियां’ यांसारख्या चित्रपटांनी त्याला प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख मिळवून दिली. मात्र आजचा प्रेक्षक आणि चित्रपटाचा बाजार मोठ्या प्रमाणात बदलला आहे.
सुनीता अहुजा म्हणाली, “माझे वडील चित्रपट वितरक होते. मी घरी चित्रपटांबद्दलच्या चर्चा पाहिल्या आहेत. संजीव कुमार आणि दिलीप कुमार यांच्यासारखे अभिनेते माझ्या घरी यायचे. गोविंदा विरारमध्ये राहत होता. त्याचं बालपण खडतर होतं. तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत नसे किंवा सुट्ट्यांमध्ये फिरायलाही जात नसते. जेव्हा आमचं अफेअर सुरू झालं, तेव्हा त्याला माझा हात धरायलाही भीती वाटत होती. मीच त्याला प्रेम शिकवलं. म्हणूनच तो चांगले रोमँटिक चित्रपट करू शकला. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांमुळे संघर्ष करत आहे. गोविंदा खूप भोळा आहे. आजूबाजूचे लोक जे काही सांगतात, त्यावर तो विश्वास ठेवतो. मी खरं सांगितलं तर माझी प्रतिमा चांगली दिसत नाही.”
एकेकाळी बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा गोविंदा गेल्या काही काळापासून चित्रपटांमध्ये फारसा दिसलेला नाही. 2019 मध्ये आलेल्या ‘रंगीला राजा’नंतर त्याच्या मोठ्या पडद्यावरील कामाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. त्यामुळे आता गोविंदा कोणत्या प्रकारच्या भूमिकेतून कमबॅक करणार, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे.