तिने मुलाला आमच्यापासून दूर..; प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल सासऱ्याचं वक्तव्य, म्हणाले ’18 वर्षे सोबत राहिली पण..’
Suriya and Jyotika: आज दोन दशकांनंतरही सूर्या आणि ज्योतिका यांचं नातं चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. शिवकुमार यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या प्रेमकथेतील आणखी एक खास पैलू समोर आला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सूर्या आणि ज्योतिका सध्या त्यांच्या लग्नाच्या विसाव्या वर्षानिमित्त चर्चेत आहे. नुकताच दोघांनी त्यांच्या लग्नाच्या वचनांचं नूतनीकरण करत खास सोहळा केला. या निमित्ताने सूर्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार यांनी मुलगा आणि सून ज्योतिका यांच्या नात्याबद्दल अनेक वर्षांनंतर काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्योतिकाशीच लग्न करण्यासाठी सूर्याने तब्बल चार वर्षे वाट पाहिली होती, असा खुलासा त्यांनी केला. शिवकुमार यांनी सांगितलं की, सूर्याची आई जेव्हा त्याला प्रेमसंबंधांबद्दल विचारायची, तेव्हा तो सहज कोणाच्याही प्रेमात पडणार नसल्याचं सांगायचा. पुढे त्याची भेट मुंबईतील ज्योतिकाशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
सूर्याने ज्योतिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळपास चार वर्षे वाट पाहिली. जर लग्न करायचं असेल तर ज्योतिकाशीच करणार, अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे या नात्याबाबत तो सुरुवातीपासूनच गंभीर होता, असं शिवकुमार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.
ज्योतिकाने लग्नानंतर घेतला मोठा निर्णय
शिवकुमार यांनी ज्योतिकाचं विशेष कौतुक केलं. लग्नानंतर ज्योतिकाकडे सूर्याला घेऊन मुंबईत स्थायिक होण्याचा पर्याय होता. मात्र तिने तसं केलं नाही. ती तब्बल 18 वर्षे कुटुंबासोबत राहिली, असं शिवकुमार यांनी सांगितलं. लग्नानंतर ज्योतिकाने दोन मुलांना जन्म दिला. मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोघांची नावं आहेत. दोन्ही मुलांचं संगोपन करताना ज्योतिकाने कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं शिवकुमार यांनी सांगितलं. आज त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
“लग्नानंतर ज्योतिका सूर्याला मुंबईत येऊन तिथेच स्थायिक व्हायला लावू शकली असती. मी काहीही बोलू शकलो नसतो. पण ती इथे 18 वर्षे राहिली. शिवाय आजकाल नायिका सहसा लग्नानंतर बाळंतपणासाठी तयार नसतात आणि नवऱ्यांनाही घर सोडायला भाग पाडतात. पण ज्योतिकाने आमच्यासोबत राहून संसार केला आणि दोन मुलांनाही जन्म दिला. आता त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. वीस वर्षे सुखी वैवाहिक जीवन जगणाऱ्या आणि आपल्या करिअरच्या सुरुवातीला असलेलं प्रेम आजही टिकवून ठेवणाऱ्या एका सेलिब्रिटी जोडप्याला पाहणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. मला असा मुलगा आणि सून मिळाल्याचा अभिमान आहे”, अशा शब्दांत शिवकुमार व्यक्त झाले.
सूर्या आणि ज्योतिका यांनी 2006 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोन दशकं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा लग्नाच्या वचनांचं नूतनीकरण केलं. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. ज्योतिकाने या सोहळ्याबद्दल सोशल मीडियावर लिहिताना हे ‘परिपूर्ण लग्नाचा’ उत्सव नसून, एकमेकांना समजून घेणं, तडजोडी, त्याग आणि निस्वार्थ प्रेम यांचा प्रवास साजरा करण्याचा क्षण असल्याचं म्हटलं.