Neem Karoli Baba : ‘बुलावा आला’ म्हणत काजोलच्या बहिणीची कैंची धामला भेट; तनीषा मुखर्जीने शेअर केले खास फोटो
Neem Karoli Baba : 'हनुमान अंश' फिल्मची बरीच चर्चा सुरू आहे. याच दरम्यान अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने नीम करौली बाबा यांचं कैंची धाम गाठलं. तिने तिथले काही फोटोदेखील शेअर केलेत.

Tanishaa Mukerji: ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या चर्चेनंतर तनीषा मुखर्जी हिने नीम करौली बाबांच्या कैंची धाम आश्रमाला भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक कैंची धाममध्ये पोहोचत असल्याचे वृत्त समोर आले होते. वाढत्या गर्दीमुळे स्थानिकांना आणि भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचीही चर्चा होती. मात्र, या पार्श्वभूमीवर तनीषा हिने श्रद्धेने आश्रमाला भेट देत नीम करौली बाबांचे दर्शन घेतले. तनीषाने मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कैंची धाम भेटीचे तब्बल 10 फोटो शेअर केले. “कैंची धाममध्ये नीम करौली बाबांचे दर्शन घेतले. आयुष्य हा वेळेचा खेळ आहे. बुलावा येतो. ब्लेस्ड.” असं तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं.
गर्दी पाहून चिंता
तनीषा हिने आपल्या पोस्टमध्ये कैंची धाममधील वाढत्या गर्दीचाही उल्लेख केला. तिने लिहिले की, “ मी 3 ऑक्टोबरच्या रील्स पाहिल्या होत्या. त्यामुळे तिथे किती गर्दी असेल, याची थोडी चिंता होती. पण बाबांवर विश्वास ठेवून आपणही समुद्रात नाव सोडली.” कैंची धामपासून गोलू देवतेच्या मंदिरापर्यंतचा प्रवास आणि पुढील अनुभवही तिने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला. “जादुई” असं या संपूर्ण प्रवासाचे वर्णन तिने केलं.
‘हनुमान अंश’ची एवढी चर्चा का ?
‘हनुमान अंश’ हा चित्रपट नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितलं जातं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरुवातीच्या दोन आठवड्यांत त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईला अचानक वेग आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर अनेक प्रेक्षक आणि भाविक नीम करौली बाबांशी संबंधित स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक झाले. त्याचा परिणाम कैंची धाममध्येही दिसून आला आणि गेल्या काही दिवसांत येथे मोठी गर्दी झाल्याचे वृत्त समोर आले.
दिग्दर्शकानेही केली होती भाविकांना विनंती
कैंची धाममध्ये वाढलेल्या गर्दीची माहिती समोर आल्यानंतर ‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक आणि लेखक विशाल चतुर्वेदी यांनीही भाविकांना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी भक्तांनी केवळ कैंची धामवर गर्दी न करता नीम करौली बाबांशी संबंधित इतर ठिकाणांनाही भेट द्यावी, असे सुचवले होते.