प्रसिद्ध अभिनेत्यावर चाहत्याने फेकली फुलं; बॉम्ब समजून काढला पळ, व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

निवडणुकीपूर्वीच्या सायकल रॅलीदरम्यान या प्रसिद्ध अभिनेत्यावर एका चाहत्याने फुलांचा वर्षाव केला. परंतु बॉम्ब समजून तो अभिनेता इतका घाबरला, की त्याने थेट सायकल तिथेच सोडून पळ काढला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्यावर चाहत्याने फेकली फुलं; बॉम्ब समजून काढला पळ, व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 12:44 PM

येत्या 23 एप्रिल रोजी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. प्रसिद्ध तमिळ अभिनेता थलपती विजयसुद्धा या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे. यासाठी तो त्याच्या प्रचारात कोणतीही कसर सोडत नाहीये. नुकताच विजय कन्याकुमारी इथल्या एका सायकल रॅलीमध्ये सहभागी झाला होता. परंतु या रॅलीदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे विजयला आपली सायकल सोडून पळून जावं लागलं. रॅलीमध्ये सायकल चालवत असताना विजयवर एका चाहत्याने अचानक फुलांचा वर्षाव केला. यामुळे तो प्रचंड घाबरला आणि कोणीतरी बॉम्ब फेकल्याचं वाटून त्याने त्याची सायकल सोडून पळ काढला. थलपती विजयच्या रॅलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये विजय रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या समर्थकांना आणि चाहत्यांना पाहून हसतो, त्यांना अभिवादन करतो. त्याचवेळी त्याच्या सायकलसमोर असलेला एक चाहता हातातील फुलं त्याच्यावर उधळतो. हे पाहून विजय घाबरतो आणि सायकल तिथेच सोडून पळ काढतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘थलपती विजयने या व्हिडीओमध्ये त्याचं भविष्य दाखवलं आहे, ड्रामा क्वीन’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ऑस्कर परफॉर्मन्स’ अशी उपरोधिक टीका दुसऱ्या युजरने केली आहे. ‘राजकारणात येण्यापूर्वी लोकप्रियता कशी हाताळावी यावर त्याने रजनीकांत सरांकडून एक मास्टरक्लास घ्यायला हवा होता’, असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला आहे.

पहा व्हिडीओ-

साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात आणि ते काहीही करायला तयार असतात. याआधी थलपती विजयच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. विजयने राजकारणात प्रवेश केला असून समाजकार्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने अभिनयक्षेत्र सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे ‘जन नायकन’ हा त्याचा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही भूमिका आहेत. ‘जन नायकन’ हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु सेन्सॉरशिपमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा प्रश्न सुटण्यापूर्वीच चित्रपटाचे काही भाग सोशल मीडियावर लीक झाले होते.

Follow Us