Thalapathy Vijay : समुद्रकिनारी महालासारखा बंगला, आलिशान गाड्या; तब्बल इतक्या संपत्तीचा मालक आहे थलपती विजय
Thalapathy Vijay Net Worth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सध्या त्यांच्या राजकीय रॅलीमुळे चर्चेत आहे. शनिवारी विजय यांच्या पक्षाच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. त्यात 39 जणांनी जीव गमावला.

Thalapathy Vijay Net Worth : तमिळनाडूच्या करूर इथं ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या सभेत गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. चित्रपटसृष्टीतून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या विजय यांचा दक्षिणेत मोठा चाहतावर्ग आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ते सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘फॉर्च्युन इंडिया’ने गेल्या वर्षी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशभरात 2024 मध्ये सर्वाधिक अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विजय दुसऱ्या क्रमांकावर होते. यावरूनच त्यांच्या संपत्ती आणि कमाईचा अंदाज लावला जाऊ शकतो.
आपल्या दमदार अभिनयाने थलपती विजयने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांचा चाहतावर्ग केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. विजय फक्त त्यांच्या चित्रपटांमधूनच नाही तर विविध जाहिराती, रिअल इस्टेट आणि इतर गुंतवणुकीतूनही प्रचंड पैसा कमावतात. ‘फोर्ब्स’ने दिलेल्या आकड्यांनुसार, थलपती विजय यांची एकूण संपत्ती तब्बल 474 कोटी रुपये आहे. यापैकी त्यांची सर्वाधिक कमाई चित्रपटांच्या माध्यमातून होते.
विजय त्यांच्या एका चित्रपटासाठी तब्बल 130 ते 200 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात. 2024 या वर्षातील ‘GOAT’ (The Greatest of All Time) या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 200 कोटी रुपये फी घेतली होती. याबद्दलचा खुलासा चित्रपटाच्या निर्मत्यांनीच केला होता. चित्रपटांशिवाय कोका-कोला, सनफीस्टसह इतर अनेक ब्रँड्ससाठीच्या जाहिरातींमधून ते मोठी रक्कम कमावतात. त्याचसोबत त्यांच्या एकूण संपत्तीत रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, चित्रपट निर्मितीतून होणारी कमाई आणि इतर गुंतवणुकींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी ‘फॉर्च्युन इंडिया’ने देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती. यात पहिल्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान होता. त्याने 2024 या आर्थिक वर्षात 92 कोटी रुपये कर भरला होता. तर या यादीत दुसऱ्या स्थानी विजय होते. त्यांनी 80 कोटी रुपये टॅक्स भरला होता.
चेन्नईतील नीलंकराई इथल्या समुद्रकिनारी असलेल्या कॅसुआरिना ड्राइव्हवर विजय यांचा अत्यंत आलिशान बंगला आहे. हॉलिवूड स्टार टॉम क्रूझच्या समुद्रकिनाऱ्यावरील घरापासून प्रेरणा घेत विजय यांनी त्यांच्या बंगल्याची रचना केली आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात रोल्स रॉयस घोस्टपासून ते बीएमडब्ल्यू एक्स 5- एक्स 6, ऑडी ए 8 एल, रेंज रोव्हर इव्होक, फोर्ट मस्टँग, व्होल्वो एक्ससी 90 आणि मर्सिडीज बेंझ यांचा समावेश आहे.
