Vijay Rally Stampede : उभं राहायलाही नव्हती जागा, श्वास घ्यायलाही त्रास; चेंगराचेंगरीतील प्रत्यक्षदर्शींचे भयानक अनुभव
Vijay Rally Stampede : अभिनेता विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीतील प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Vijay Rally Stampede : तमिळनाडूतील करूर जिल्ह्यात साऊथ सुपरस्टार विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचे बळी गेले. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याबद्दलची माहिती आता समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि मृतांच्या नातेवाईकांनी या भयानक दुर्घटनेविषयी माहिती दिली आहे. चेंगराचेंगरीच्या वेळी सभास्थळी उपस्थित असलेले सूर्या म्हणाले की, परिस्थिती इतकी भयानक होती की रुग्णवाहिकांनाही आत जाण्यासाठी जागा मिळत नव्हती. लोकांना तिथे उभं राहण्यासाठीही पुरेशी जागा नव्हती. जखमींना तिथून बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला, ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नंदकुमार यांनी सांगितलं, “आम्ही तिथे होतो. गर्दी नियंत्रित करण्यासाठी काहीही करता आलं नाही. विजय सकाळी 11 वाजेपर्यंत करूर इथं पोहोचतील असं सांगितलं होतं. सर्वांना त्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यांना पोहोचायला खूप उशीर झाला होता. यात चूक कोणाची आहे, हे जाणून घेणं कठीण आहे. परंतु लोक त्यांची वेळेवर येण्याची आशा बाळगून होते. बरेच जण मुलांसोबत होते, भुकलेले होते. योग्य सुरक्षाव्यवस्था केली असती तरी अपेक्षेपेक्षा दहा ते पंधरा पट जास्त लोक आले तर कोणी काय करू शकलं असतं? अशा घटनांचं नियोजन खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे.”
आणखी एका पीडितेचा नातेवाईक झाकीर म्हणाले, “विजय सकाळी 11 वाजता येणार होते, पण ते त्या वेळेला पोहोचले नाहीत. त्यामुळेच मोठी गर्दी जमली होती. विशेषकरून तिरुकोइलूर परिसरात महिला आणि तरुणांची मोठी गर्दी होती. अशा रॅलीमध्ये महिला आणि लहान मुलांना आणणं योग्य नाही. हा अत्यंत वेदनादायी आणि भावनिकदृष्ट्या कठीण अनुभव होता.” या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सभेच्या ठिकाणी विजय यांचं आगमन झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होताच चेंगराचेंगरी झाली. यावेळी नागरिकांची पळापळ झाल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करूर सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
